

बदलापूर : मध्य रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी स्वतः घेतलेल्या निर्णयावर कोणताही विश्वास नसल्याने व हा निर्णय रेल्वे प्रवाशांच्या विरोधातच असल्याचे सिद्ध झाल्यानंतर आपला निर्णय योग्य असल्याचा भास तयार करण्यासाठी बदलापूर स्थानकावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला. प्रचंड पोलीस बंदोबस्त लावून बदलापूरकरांवर दडपशाहीच्या मार्गाने हा निर्णय लादण्यासाठी बदलापूर रेल्वे स्थानकावर सोमवारी पहाटेपासूनच तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कल्याण, ठाणे येथून अतिरिक्त कुमक मागवून वरिष्ठ पोलीस अधिकारी स्वतः रेल्वे स्थानकावर ठाण मांडून बसले आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने जर हा निर्णय रेल्वे प्रवाशांच्या सुखसुविधा वाढवण्यासाठी घेतला असल्याचा दावा करत असतील तर ही दडपशाही कशासाठी? असा सवाल बदलापुरातील रेल्वे प्रवासी व्यक्त करत असून रेल्वे प्रशासनाच्या या वृत्तीचा प्रवाशांकडून तीव्र निषेध व्यक्त होत आहे.
बदलापुरात होम प्लॅटफॉर्मचे काम गेल्या दहा वर्षांपासून संथ गतीने सुरू आहे. अर्धवट अवस्थेत असलेल्या होम प्लॅटफॉर्म आणि इतर सोयी सुविधांची वानवा बदलापूर स्थानकात आहे. त्यातच बदलापूर प्रवाशांची संख्या वाढत असताना तुलनेने गाड्यांची संख्या ही वाढलेली नाही. त्यामुळे बदलापुरातील रेल्वे प्रवासी रेल्वे प्रशासनाकडे वारंवार करत असलेल्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून भलत्याच कामांना प्राधान्य देत रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या विरोधात घेत असलेल्या निर्णयाविरोधात बदलापुरातील प्रवासी अत्यंत संतापले आहेत. प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर लोखंडी रेलिंग लावून बंद केल्यानंतर बदलापूरवरून मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे सुटणाऱ्या गाड्या पकडण्यासाठी सकाळपासूनच रेल्वे स्थानकावर प्रवाशांमध्ये संभ्रम होता. यात काही प्रवासी चढताना खाली पडल्याचेही प्रत्यक्षदर्शनी सांगितले. रेल्वे प्रशासनाने हा निर्णय मागे घ्यावा यासाठी आता बदलापुरातील रेल्वे प्रवासी संघटना आणि रेल्वे प्रवासी रेल्वे प्रशासना विरोधात आक्रमक होण्याच्या तयारीत आहेत.
रेल्वे प्रशासना विरोधात प्रवाशांनी घेतलेल्या भूमिका दडपण्यासाठीच बदलापूर रेल्वे स्थानकावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करून कोणतेही आंदोलन अथवा प्रवाशांनी रेल्वे प्रशासना विरोधात कोणतीही भूमिका घेऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाने हा पोलीस बंदोबस्त ठेवल्याची भावना प्रवाशांमध्ये झाली आहे.