

बदलापूर : जानेवारी 20 24 मध्ये मध्य रेल्वे प्रशासनाने होम प्लॅटफॉर्म बंद करण्याचा घेतलेल्या निर्णयाला स्थगिती दिली होती. लोकसभा निवडणुकांच्या आधी मध्य रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाला बदलापुरातील रेल्वे प्रवाशांनी केलेल्या कडाडून विरोधानंतर तत्कालीन खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनीही विरोध केल्यामुळे बदलापूर रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक एक बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने तात्पुरता स्थगित केला होता. आता मात्र रेल्वे प्रशासनाने हा तुघलकी निर्णय पुन्हा एकदा जाहीर करून शनिवारी आणि रविवारी रात्री यासाठी मेगाब्लॉक जाहीर केला आहे. (Badlapur Railway Station)
याबाबत प्रवाशांमध्ये कुठेही वाच्यता होऊ नये, म्हणून अत्यंत गोपनीयता पाळण्यात आली आहे. सध्या अस्तित्वात असलेला प्लॅटफॉर्म क्रमांक एक हा कायमस्वरूपी रेलिंग लावून बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे बदलापूर पूर्वेकडे राहणाऱ्या प्रवाशांना मोठी फरपट होणार आहे. इतकच नाही तर पूर्वेकडील प्रवाशांना पश्चिमेकडे जाऊन मग प्लॅटफॉर्म क्रमांक एक वरून ( सध्याच्या होम प्लॅटफॉर्म) वरून गाडी पकडावी लागणार आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने बदलापूरकरांची केलेली ही शुद्ध फसवणूक असून होम प्लॅटफॉर्मच्या नावाखाली बदलापूरकरांना मध्य रेल्वेच्या या प्रशासना विरोधात बदलापुरातील रेल्वे प्रवासी अत्यंत आक्रमक भूमिका घेण्याच्या मनस्थितीत आहेत.
होम प्लेट फॉर्म हा एक नंबर जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे कर्जत आणि खोपोलीला जाणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा फटका सहन करावा लागणार आहे. कारण कर्जत खोपोलीला जाणारे अनेक प्रवासी हे बदलापूर गाडीने बदलापूर स्थानकावर येऊन त्याच स्थानकावर उतरून नंतर कर्जत गाडी पकडत होते. आता मात्र त्यांना प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर उतरून सध्याच्या होम प्लॅटफॉर्मवर उतरून जिन्याने पुन्हा या दुसऱ्या म्हणजे सध्या असलेल्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वर गाडी पकडण्यासाठी यावे लागणार आहे. यामध्ये लहान मुले, गरोदर स्त्रिया, ज्येष्ठ नागरिक यांना याचा मोठा फटका सहन करावा लागणार आहे. त्याचबरोबर बदलापूर ते कर्जत खोपोली आणि पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा फटका सहन करावा लागणार आहे.
सध्या बदलापुरातील प्लॅटफॉर्म क्रमांक एक वरुन मुंबई सीएसटीच्या दिशेने गाड्या सुटतात. होम प्लॅटफॉर्म चे काम लवकरच पूर्ण होणार असल्याने सध्या या ठिकाणी प्रवाशांना दिलासा मिळत असतानाच गाजर दाखवून बदलापूरकरांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार मध्य रेल्वेने प्रशासनाने केल्याची भावना बदलापुरातील संतप्त रेल्वे प्रवासी व्यक्त करत आहेत. प्लॅटफॉर्म क्रमांक एक आणि दोन वर लिफ्ट बसवणे एक्सलेटर लावणे, अशी कामे करावयाची असल्याचे सांगत प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर बॅरिकेटिंग बसवून ते पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
त्यामुळे जे प्रवासी पूर्वी प्लॅटफॉर्म क्रमांक एक आणि होम प्लॅटफॉर्मवरून मुंबई दिशेला जात होते. त्या सर्व प्रवाशांना आता होम प्लॅटफॉर्मवर जाऊन मुंबई सीएसएमटीच्या दिशेला गाडी पकडावी लागणार आहे. अर्धवट अवस्थेत असलेली काम आणि होम प्लॅटफॉर्मची अपुरी जागा यामुळे प्रवाशांची मोठी गर्दी या प्लॅटफॉर्मवर होण्याची शक्यता आहे. तसेच अनेक वेळा मुंबई सीएसएमटीला जाणारी गाडी ही प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर थांबविले जाते. त्यामुळे जर असा प्रकार घडल्यास मोठा गडबड गोंधळ होऊन जीवित हानी होण्याची ही शक्यता नाकारता येत नाही. तसेच ज्या प्रवाशांना वांगणी ते कर्जत पुणे किंवा खोपोलीपर्यंत प्रवास करायचा आहे ते अनेक प्रवासी बदलापूर स्थानकात उतरत होते. त्यांनाही आता कर्जत गाडी पकडण्यासाठी संपूर्ण प्लॅटफॉर्मवर ब्रिज चढून प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वर यावे लागणार आहे.
रेल्वे प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुंबईमध्ये बसून निर्णय घेताना स्थानिक परिस्थितीचा कोणताही विचार न करता थेट बॅरिकेटिंगचे काम सुरू करून बदलापुरातील रेल्वे प्रवाशांना आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना जुमानत नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. बदलापुरात आधीच रेल्वे गाड्यांची संख्या कमी आहे. त्यात सुविधांची वाणवा असताना मध्य रेल्वे प्रशासन ठेकेदारांचे तळे उचलण्यासाठी प्रवाशांना वेठीस धरत असल्याने बदलापुरातील प्रवासी संताप व्यक्त करत आहेत. 'भीक नको, पण कुत्रा आवर', असे या कामाच्या निमित्ताने म्हणण्याची वेळ आता बदलापूरकरांवर आली आहे.