

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा: बदलापूर हत्याकांडाची कल्याणात (Kalyan Crime News) पुनरावृत्ती झाल्याचा कयास बांधला जात आहे. कल्याणच्या चक्की नाक्यावर राहणाऱ्या 12 वर्षीय मुलीचे अपहरण करून अत्याचार केल्यानंतर तिचा निर्घृण खून केल्याप्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत एकूण तीन जणांना ताब्यात घेतले आहे. यातील मुख्य आरोपी विशाल गवळी (Vishal Gawli) याच्यासह त्याची पत्नी साक्षी हिचा सामावेश आहे. पोलिसांनी विशालची पत्नी साक्षी गवळीची कसून चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशालने तब्बल तीन लग्न केली आहेत. त्याच्या विरोधात 6 गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांच्या नोंदी असून त्याला जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते.
विशालची (Vishal Gawli) पत्नी साक्षी गवळी हिला कोळसेवाडी पोलिसांनी बुधवारी कल्याण कोर्टात हजर केले असता कोटाने तिला दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तर दुसरीकडे मुलीचा खून करून विशाल गवळी पसार झाला. पोलिसांचे पथक त्याचा माग काढत बुलढाण्यात पोहोचले. शेगावमधील एका सलूनमधून त्याच्या मुसक्या आवळल्या. वेष बदल्यासाठी त्याने दाढी केली. बेसावध असतानाच पोलिसांनी त्याची मानगूट पकडली. त्याच्यावर या आधी दोन विनयभंग, मुलावर अनैसर्गिक अत्याचार, मारामाऱ्यांचे 2 गुन्हे आणि एक जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे.
अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोपी विशाल गवळी पत्नीच्या गावी लपून बसला होता. पत्नीच्या गावातून अर्थात शेगाव येथून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. मुलीच्या हत्येप्रकरणी गवळी याची पत्नी साक्षीने पोलिसांसमोर धक्कादायक वास्तव कथन केले. मुलीला सायंकाळी पाच वाजता घरात घेतले. त्यावेळी विशालने त्या मुलीसोबत गैरकृत्य करून तिची हत्या केली. त्यानंतर एका मोठ्या बॅगमध्ये मुलीचा मृतदेह टाकून ठेवला होता. साक्षी बँकेत नोकरी करत असल्याने संध्याकाळी 7 वाजता ती घरी आली. त्यावेळी विशाल याने पत्नी साक्षीला घडलेला सर्व प्रकार सांगितला. हे ऐकून साक्षीला धक्काच बसला. मात्र, नंतर 7 वाजता पती-पत्नीने एकत्र बसून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी योजना आखली. घरात सांडलेले रक्त दोघांनी मिळून पुसून टाकले. रात्री 8.30 वाजता मित्राची रिक्षा विशालने बोलावून घेतली. 9 वाजता बापगावच्या दिशेने रवाना झाले. बापगाव येथील कब्रस्तान नजीकच्या निर्जनस्थळी मुलीचा मृतदेह फेकून दोघे घरी परतले. (Kalyan Crime News)
घरी परतत असताना विशालने आधारवाडी चौकातील एका बारमधून दारू विकत घेतली आणि तेथून आपल्या पत्नी साक्षीच्या गावी निघून गेला. पत्नी साक्षी मात्र कल्याणला परतली. मात्र घराबाहेर सांडलेल्या रक्तामुळे हे कृत्य विशाल यानेच केल्याचा पोलिसांचा संशय बळावला. त्यामुळे पोलिसांनी साक्षीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने घडलेल्या साऱ्या प्रकाराची इत्यंभूत माहिती दिली.
उमल्या कळीला कुस्करून तिला कायमची नष्ट करणाऱ्या नराधमाच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा यत्किंचितही लवलेश नव्हता, हे त्याने (Vishal Gawli) ज्या बारमधून दारू खरेदी केली. त्या बारमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या व्हिडिओतून दिसून आले. आरोपी विशाल याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुलीचा मृतदेह टाकल्यानंतर विशालने आधारवाडी परिसरातील एका बारमधून दारूची बाटली खरेदी केली. मुलीसोबत केलेल्या कृत्याचा त्याच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत नव्हता.
बहुचर्चित बदलापूर हत्याकांडाप्रमाणे या आरोपीवर देखील तशीच कारवाई करा, अशी मागणी कल्याण पूर्वच्या आमदार सुलभा गायकवाड यांनी यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना केली आहे. बदलापूरमधील आरोपी अक्षय शिंदे याचीही तीन लग्न झाली आहेत. त्याच प्रमाणे या प्रकरणातील आरोपीची देखील तीन लग्न झाली आहेत. बदलापूरच्या आरोपी प्रमाणेच या आरोपी सोबत करा. त्याला कठोर शासन करा, अशी मागणी आपण मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे आमदार गायकवाड यांनी सांगितले. (Kalyan Crime News)