

पुढारी ऑनलाईन डेस्क : Thane Badlapur Heavy Rain : ठाणे जिल्ह्यात गेल्या 24 तासांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. उल्हास नदी पात्राबाहेर आली असून नदीचे पाणी बदलापूर शहरामध्ये शिरले आहे. बदलापूरमधील अनेक परिसरात गुडघाभर पाणी साचले आहे.
ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळा आणि कार्यालयांना सुटी देण्यात आली आहे. गुरुवारी सकाळपासून ठाणे जिल्ह्यात जबरदस्त पाऊस कोसळत आहे. उल्हासनदीने साडेसतरा मीटर ही पुर रेषा ओलांडल्यानंतर बदलापूरात एनडीआरएफची 35 जणांची टीम रवाना झाली. उल्हासनगरातील पेट्रोल पंप देखील पाण्याखाली गेला आहे. कल्याण अशोक नगर परिसर जलमय झाला आहे. वालधुनी नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या या अशोक नगरामधील अनेक घरे पाण्याखाली गेली आहेत. तेथील रहिवाशांचे स्थलांतर करण्यात आले आहे.
उल्हास नदीचे पाणी बदलापुरवरून कर्जतकडे जाणाऱ्या राज्य महामार्गावर आल्यामुळे हा महामार्ग बंद झाला आहे. चामटोली गावाजवळ महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. बदलापूर आणि वांगणी दरम्यान चामटोली गावाजवळ रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून त्यामुळे पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून कर्जतकडे जाणारा हा राज्य महामार्ग बंद केला.