

बदलापूर : मुरबाड विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी उत्सुक असलेले बदलापूरचे शहराध्यक्ष शैलेश वडनेरे यांनी मंगळवारी (दि.२२) आपल्या पदाचा राजीनामा देत पक्षाचा निषेध व्यक्त केला आहे. त्यांनी अपक्ष निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. (Maharashtra Assembly Election|Shailesh Vadnere)
राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर प्रामाणिक काम करणाऱ्या व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट बदलापूर शहरात हिमतीने मोठा उभा करून लोकसभेत निर्णयक मते देऊन विजय मिळवून देणाऱ्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना डावलण्याचे काम केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या नेतृत्वाने ठाणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि शिवसेना शिंदे गटाचे सहसंपर्कप्रमुख सुभाष पवार यांना पक्षात घेऊन त्यांना उमेदवारी देण्याचे निश्चित केले आहे. याच्या निषेधार्य आपण राजीनामा देऊन अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे शैलेश वडनेरे यांनी जाहीर केले.
त्यामुळे सुभाष पवार यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. सुभाष पवार यांचा बदलापूर शहरात शून्य प्रभाव आहे. तसेच निवडणुकीच्या तोंडावर ते अद्यापही बदलापूर शहरात उमेदवार म्हणून कोठेही दिसलेले नाहीत. त्यातच राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या शहराध्यक्षांनी दिलेल्या राजनाम्यामुळे सुभाष पवार यांच्या अडचणीत आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच बदलापूर शहरातून सुभाष पवार यांना निवडणुकीचे काम करण्यासाठी कार्यकर्ते शोधण्यातच मोठी दमछाक होणार आहे. (Maharashtra Assembly Election|Shailesh Vadnere)