नांदेड : जिल्ह्यातील ९ विधानसभा मतदारसंघासह नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया मंगळवार पासून सुरू होत असली, तरी सर्वच मतदारसंघातील राजकीय चित्र अस्पष्ट आहे.
लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने रवींद्र वसंतराव चव्हाण यांची उमेदवारी गेल्या आठवड्यात जाहीर केली, पण महाविकास आघाडीतील जागा वाटपाच्या तिढ्यामुळे काँग्रेसला जिल्ह्यातील विधानसभेचा एकही उमेदवार जाहीर करता आलेला नाही.
भाजपाने रविवारी जिल्ह्यातील तीन विद्यमान आमदारांसह भोकरमधून श्रीजया अशोक चव्हाण यांची उमेदवारी जाहीर केली. तथापि लोकसभेसाठी भाजपाला सोमवारी सायंकाळपर्यंत उमेदवार ठरवता आला नाही. कालच्या घडामोडीमध्ये माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे नाव लोकसभेचे उमेदवार म्हणून पुढे आले.
महाविकास आघाडीत मोहन हंबर्डे (नांदेड द.) आणि माधवराव जवळगावकर (हदगाव) हे काँग्रेस आमदार उमेदवारीचे दावेदार असले, तरी अंतर्गत घोळामुळे त्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे. भाजपाने देगलूरमध्ये जीतेश अंतापूरकर यांना तिष्ठत ठेवले तर नांदेड (द.) मतदारसंघ भाजपाला सुटणार का, याचा फैसला होऊ शकलेला नाही.
महायुतीत लोहा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्यास जाणार असल्याची चर्चा सोमवारी सुरू झाली. त्यामुळे या मतदारसंघात भाजपातर्फे लढण्याच्या चिखलीकर यांचा इरादा बारगळल्याचे सांगण्यात आले. या मतदारसंघात चिखलीकरांच्या भगिनी आशा श्यामसुंदर शिंदे 'राष्ट्रवादी'तर्फे निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत.
नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून विद्यमान आमदार बालाजी कल्याणकर यांची उमेदवारी निश्चित असून त्यांना कागदपत्रांची जमवाजमव करण्यास सांगण्यात आले आहे. महाविकास आघाडीमध्ये हा मतदारसंघ मिळवण्यावरून काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात रस्सीखेच सुरू असल्याचे सांगण्यात आले. काँग्रेसचे इच्छुक उमेदवार, माजी महापौर अब्दुल सत्तार व त्यांच्या समर्थकांनी उमेदवारी मिळावी यासाठी दिल्लीपर्यंत धाव घेतली आहे.
माजी आमदार सुभाष साबणे यांनी शनिवारी भारतीय जनता पक्षातील सर्व पर्दाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर परिवर्तन महाशक्तीने सोमवारी जाहीर केलेल्या आपल्या काही उमेदवारांच्या यादीत देगलूर मतदारसंघातून सुभाष सावणे यांच्या नावाची घो षणा केली आहे. तसेच हदगाव मतदारसंघातून माधव दादाराव देवसरकर यांचे नाव जाहीर झाले आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघात एमआयएमचे इम्तियाज जलील उभे राहणार असल्याचे जाहीर झाले होते. ते अर्ज केव्हा दाखल करणार, हे अद्याप निश्चित झाले नसल्याचे पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी सांगितले.