

Ulhasnagar Municipal Corporation House Leader
उल्हासनगर : महासभेचा प्रस्ताव तयार करताना शिवसेना नेते हे भाजपला विचारात घेत नाही, युतीत योग्य तो सन्मान होत नाही, हे कारण पुढे करत भाजपने सभात्याग केला. मात्र, त्यानंतर शिवसेनेने मोठी राजकीय खेळी करत महायुतीच्या वाटपात भाजपच्या वाट्याला गेलेले सभागृह नेता पद हे शिवसेनेच्याच गटनेत्याला देत कोंडी करण्याचा प्रयत्न केला.
उल्हासनगर महापालिकेच्या शुक्रवारी (दि.१५) पार पडलेल्या महासभेत मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. महासभा सुरू होताच भाजप नगरसेवकांनी सभात्याग करत सत्ताधारी शिवसेनेविरोधात नाराजी व्यक्त केली. महासभेचा अजेंडा तयार करताना भाजपला विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप भाजप गटनेते राजेश वधारिया यांनी सभागृहात केला. यानंतर भाजप उप महापौर अमर लुंड यांच्यासह सर्व 37 नगरसेवकांनी सभात्याग केला.
महासभेत बोलताना राजेश वधारिया यांनी, “महापालिकेच्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करताना विरोधी पक्षाला विश्वासात घेतले जात नाही. महासभेचा अजेंडा तयार करतानाही भाजपच्या सूचनांकडे दुर्लक्ष केले जाते,” असा आरोप केला. या भूमिकेच्या निषेधार्थ भाजपने सभात्याग केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भाजपच्या सभात्यागानंतरही महासभेचे कामकाज सुरू ठेवण्यात आले. शिवसेनेच्या नगरसेवकांनी विविध विषयांवर चर्चा करत सभा पूर्ण केली.
दरम्यान, शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्र चौधरी यांनी भाजपच्या भूमिकेवर टीका केली. लोकशाही व्यवस्थेमध्ये चर्चा करून प्रश्न सोडवले पाहिजेत. सभात्याग करून प्रश्न सुटत नाहीत. भाजपचे हे वागणं योग्य नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. महासभेच्या शेवटी महापौर अश्विनी निकम यांनी शिवसेनेचे गटनेते अरुण आशान यांची सभागृह नेतेपदी नियुक्ती जाहीर केली. त्यांच्या नियुक्तीनंतर शिवसेना नगरसेवकांनी आनंद व्यक्त करत अभिनंदन केले.
दरम्यान, सभागृह नेता पद भाजपच्या वाट्याला जाणार असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून महापालिका वर्तुळात सुरू होती. मात्र महासभेत भाजपने घेतलेल्या सभात्यागाच्या भूमिकेमुळे हे पद शिवसेनेकडेच कायम राहिल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे भाजपला राजकीयदृष्ट्या मोठा फटका बसल्याची चर्चा महापालिकेच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. अरुण आशान यांच्या नियुक्तीनंतर महापालिकेतील सत्ता समीकरणांवरही नव्याने चर्चा सुरू झाली असून आगामी काळात शिवसेना आणि भाजप यांच्यातील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.