

आधुनिक व स्पर्धेच्या युगात शिक्षण पद्धतीमध्ये अनेक बदल होताना दिसत आहेत. हे सर्व बदल विद्यार्थी, पालक धावपळीच्या जीवनामध्ये स्वीकार करत आहेत. परंतु विद्यार्थ्यांना शाळा, शिकवणी वर्ग तसेच पालकांची घरची परिस्थिती हालाखीची असल्यामुळे कित्येक वेळा मुलांना वडिलांच्या व्यवसायामध्ये वडिलांना मदत करावी लागते. त्यामुळे शाळेतील अभ्यासाकडे नकळत दुर्लक्ष होत असते. तसेच संगणकाच्या युगात विद्यार्थी मोबाईलच्या सानिध्यात जास्त असल्यामुळे तो पुस्तकापासून दूर होत चालला आहे.
ठाणे शहराच्या गजबजलेल्या रस्त्यावर, जिथे ट्रॅफिकचा गोंगाट आणि गर्दीचा कोलाहल असतो अशा लोकमान्य नगर, पाडा नं.04 वर रस्त्याच्याकडेला झाडा खाली फुल विक्रीता संजय माळी यांचा फुलाचा स्टॉल आहे. संजय माळी या फुलाच्या स्टॉल वरती फुल विक्रेत्याचे काम करून पत्नी व दोन मुले यांचा उदरनिर्वाह करून संसाराचा गाडा खेचत आहे.मुलगी आँचल इयत्ता दहावी व मुलगा अंकित माळी इयत्ता आठवी या वर्गामध्ये ज्ञानोदय विद्यामंदिर सावरकर नगर ठाणे या विद्यालयामध्ये शिक्षण घेत आहे.
अंकित माळी यांची शाळा सकाळची असल्याने दुपारच्या वेळेत हा फुल विक्रेत्याचा मुलगा फुलांच्या स्टॉलवर रस्त्याच्याकडेला शांतपणे पुस्तकात डोळे खुपसून अभ्यास करत आहे. घरची आर्थिक परिस्थिती पाहता त्याच ओझ लहान वयातच त्यांनी खांद्यावर घेतले आहे. परंतु शिक्षणाविषयी त्याची असक्ती कमी झालेली नाही. फुलं विकणार्या वडीलांना तो दिवसभर फुल विकायला मदत करतो आणि संधी मिळाली की आभ्यास करतो. ग्राहकांना सुगंधी गजरे देताना त्याच्या डोळ्यांत मात्र ज्ञानाच्या शोधाची चमक असते. फुले दिल्यानंतर शेजारी पुस्तक उघडून अभ्यासात पुन्हा मग्न होतो.
हे दृश्य पाहून अनेक प्रवाशी थांबून त्याच्याकडे पाहतात. आश्यर्च व्यक्त करतात. तर कोणी फोटो काढतात. कोणी विचारलं तर उत्तर देतो की वडीलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी शाळा सुटली की इथं वडीलांना फुलं विकायला मदत करतो, पण अभ्यास थांबवत नाही. त्याचे आई-वडील फुलांची विक्री करून उदरनिर्वाह करतात. पण अकितने परिस्थितीवर नव्हे, तर संधीवर विश्वास ठेवला आहे.
अंकितच्या या स्टॉलवर सुरू असलेल्या अभ्यासाची जिद्द अनेकांना प्रेरणा देणारी आहे. तो केवळ फुलं विकत नाही, तर प्रत्येक दिवसासोबत आपलं उज्वल भविष्य उभं करत आहे. या रस्त्याने दररोज जाणारे नागरिक अंकितच्या फुल स्टॉलवरील अभ्यासाचे कौतुक करतात. हे दृश्य खरंच आपल्या शिक्षणाच्या आणि समजुतीच्या मूल्यांना पुन्हा जागं करणारं आहे.