Thane News : आनंद परांजपे यांना अश्रू अनावर, १४ वर्षांनंतर 'आनंदाश्रमा'त येताच दाटून आल्या जुन्या आठवणी

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश
Thane News : आनंद परांजपे यांना अश्रू अनावर, १४ वर्षांनंतर 'आनंदाश्रमा'त येताच दाटून आल्या जुन्या आठवणी
Published on
Updated on

ठाणे : तब्बल १४ वर्षांच्या कालावधीनंतर शिवसेनेत घरवापसी केलेले माजी खासदार आनंद परांजपे यांनी शुक्रवारी (दि. १५) टेंभी नाका येथील 'आनंदाश्रमा'त जाऊन दिवंगत धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले. यावेळी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात आणि दिवंगत आनंद दिघे व वडील प्रकाश परांजपे यांच्या आठवणींना उजाळा देताना त्यांना अश्रू अनावर झाले.

एकनाथ शिंदेंनी दिली होती पहिली संधी

पत्रकारांशी बोलताना परांजपे यांनी २००८ मधील एक आठवण सांगितली. ते म्हणाले, "याच आश्रमाच्या मागच्या खोलीत एकनाथ शिंदे यांनी मला बोलावून घेतले होते आणि पोटनिवडणूक लढवण्यास सांगितले होते. तेव्हा मला अनुभव नसल्याने मी साशंक होतो. मात्र, 'तुझ्या नावात आनंद आहे, मी आणि शिवसेना तुझ्या पाठीशी आहोत,' असे म्हणत शिंदे साहेबांनी मला प्रोत्साहन दिले. त्यांच्या आशीर्वादामुळेच मी पहिल्यांदा खासदार झालो." ही आठवण सांगताना परांजपे अत्यंत भावूक झाले होते.

राष्ट्रवादीशी कोणतीही कटुता नाही

शिवसेना प्रवेशाबाबत स्पष्टीकरण देताना त्यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी सविस्तर चर्चा करूनच आपण शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये कोणताही वाद किंवा कटुता नाही. केवळ आपल्या मूळ परिवारात परतण्याची भावना यामागे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार

सुरुवातीला शिवसेनेचे शहर प्रमुख हेमंत पवार, माजी सभापती विलास जोशी आणि पांडुरंग पवार यांनी परांजपे यांचे आश्रमात जंगी स्वागत केले. "आजचा क्षण माझ्यासाठी अत्यंत भावनिक आहे. आजही दिघे साहेब इथे खुर्चीवर बसून आपल्या कामावर लक्ष ठेवून आहेत असे वाटते," अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे जी जबाबदारी देतील, ती प्रामाणिकपणे पार पाडण्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news