

Kalyan Murder Case
डोंबिवली : कल्याण-कसारा रेल्वेमार्गावरील आंबिवली स्टेशनजवळच्या मोहने गावात गुरूवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास मुंबईतील गोरेगावमध्ये राहणाऱ्या एका ४० वर्षाच्या मामाचा गोरेगावातीलच भाच्याने खून केला. मोहन्यात असलेल्या एका खासगी रूग्णालयाच्या पायरीवर डोके आपटून गंभीर जखमी करून त्याला ठार मारले. या खुनामागचे रहस्य तात्काळ उलगडण्यात खडकपाडा पोलिसांना यश आले असून खुन्याला देखील जागीच अटक करण्यात आली आहे.
मारिअप्पा राजू नायर (४०) असे मृत मामाचे नाव असून त्याचा भाचा गणेश रमेश पुजारी (२६) याने हा खून केला आहे. या घटनेची माहिती कळताच पोलिस उपायुक्त अतुल झेंडे, सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे, खडकपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. अमरनाथ वाघमोडे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस निरीक्षक मारूती आंधळे यांनी घटनास्थळी भेट दिली. उपस्थित अधिकाऱ्यांनी आरोपीची कसून चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी केडीएमसीच्या रूक्मिणीबाई रूग्णालयाकडे पाठवून दिला.
या प्रकरणी मोहन्यातील गणपती रूग्णालयात वॉर्डबॉय म्हणून नोकरी करणारा सागर दिलीप पगारे (वय २७) याने दिलेल्या फिर्यादीनुसार खडकपाडा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर मोहने परिसरात एकच खळबळ माजली आहे. मृत मामा आणि खूनी भाचा असे दोघेही मुंबईतील गोरेगावचे राहणारे आहेत. खूनी गणेश पुजारी याची बहीण रेश्मा अर्जुन ही मोहने परिसरात राहत असून तिची गणपती रूग्णालयात प्रसूती झाली आहे.
वॉर्डबॉय सागर पगारे याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास गणेश पुजारी हा मारिअप्पा राजू नायर याला शिवीगाळ करून बेदम मारहाण करत होता. गणपती रूग्णालयाजवळच्या पायरीजवळ हा प्रकार सुरू होता. वादावादी सुरू असताना आक्रमक झालेल्या गणेश पुजारीने मारिअप्पा नायरचे केस पकडून खेचत नेले. त्यानंतर रूग्णालयाजवळच्या पायरीवर डोके आपटले. यात मारिअप्पा नायर रक्ताच्या थारोळ्यात तडफडत त्याचा जागीच मृत्यू झाला.
हाणामारी सुरू असताना बघ्यांची गर्दी जमली होती. मात्र हल्लेखोर गणेश पुजारी इतका आक्रमक झाला होता की परिसरातील कुणाही रहिवासी वा पादचाऱ्याची मारिअप्पाला वाचविण्यासाठी पुढे जाण्याची हिम्मत झाली नाही. ही माहिती तात्काळ खडकपाडा पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी खुनी गणेश पुजारीला पळून जाण्याची संधी न देता त्याची जागीच गठडी वळली. खुनाचे खरे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मारिअप्पाला ठार मारणाऱ्या गणेश पुजारीची पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस निरीक्षक मारूती आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक भूषण देवरे या प्रकरणाचा चौकस तपास करत आहेत.
आरोपी गणेश पुजारी याची सख्खी बहीण रेश्मा अर्जुन ही मोहने परिसरात राहते. तिची गणपती रूग्णालयात प्रसूती झाली आहे. तिला भेटण्यासाठी गोरेगावहून मामा मारिअप्पा नायर आणि त्याचा भाचा गणेश पुजारी असे दोघेही मोहन्यात आले होते. भाचा गणेश याने बहिणीला रूग्णालयात भेटायला जाण्यासाठी तगादा लावत होता. मात्र आपण रूग्णालयात येणार नसल्याचे मामा मारिअप्पा सांगत होता. मात्र भाचीला भेटायला इन्कार करणाऱ्या मामाशी गणेशचे कडाक्याचे भांडण जुंपले. रागाच्या भरात त्याने मामाला पायरीवर आदळले. डोक्यास गंभीर दुखापत झाल्यानंतर रक्तस्राव होऊन मारिअप्पा जागीच गतप्राण झाला. आरोपी गणेश नायर याला अटक करण्यात आली आहे. कल्याण कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्याला अधिक चौकशीसाठी ३ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेची अधिक चौकशी करण्यात येत असल्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस निरीक्षक मारूती आंधळे यांनी सांगितले.