

नाशिक : जागा खरेदी करून ती विकसित करीत कमी कालावधीत जादा नफा देण्याचे आमिष दाखवून दोघांनी मिळून शहरातील चार ते पाच जणांना तब्बल ८८ लाख रुपयांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात फसवणूक, अपहारासह महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय आस्थापनांमधील हितसंबंधांचे रक्षण करणे कायद्यानुसार गुन्हा दाखल आहे. (Four to five persons in Nashik city have been cheated of Rs 88 lakhs by showing the lure of extra profit)
विशाल रमेश माळी (४५, रा. त्र्यंबकेश्वर) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित अमित सुरेश आष्टेकर (रा. कळवा. जि. ठाणे) व भावीन महेश धेडीया (रा. मानपाडा रोड, डोबिंवली (पूर्व)) यांनी १८ डिसेंबर २०२३ ते ऑगस्ट २०२४ या कालावधीत गंडा घातला. माळी यांच्या फिर्यादीनुसार, संशयित अमित हा त्यांच्या ओळखीचा होता. जमीन खरेदी करून विकसित करत असल्याचे अमितने माळी यांच्यासह इतरांना सांगितले होते. त्यासाठी अमित नेहमी नाशिकला ये-जा करत होता. माझ्याकडे पैसे दिल्यास दरमहा ठराविक रक्कम नफा स्वरूपात देण्यात येईल, तसेच सहा महिन्यांत बांधकाम पूर्ण झाल्यानंतर घेतलेले पैसे एकरकमी देण्याचे अमितने माळी यांच्यासह इतरांना आमिष दाखवले. त्यानुसार माळी यांनी १६ लाख ५० हजार रुपये, अभिजित महाजन यांनी २७ लाख रुपये, प्रवीण सोनावणे यांनी १२ लाख ५० हजार रुपये, सुनील चिकणे यांनी ३२ लाख रुपये असे एकूण ८८ लाख रुपये अमितला दिले. मात्र, ठरल्याप्रमाणे गुंतवणूकदारांना पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे माळी यांच्यासह इतरांनी अमितकडे पैशांची विचारणा केली असता त्याने पैसे धेडीयाकडे दिल्याचे सांगितले. दोघा संशयितांनी गुंतवणूकदारांना पैसे परत करण्याचे आश्वासन दिले. मात्र वारंवार मागणी करूनही त्यांनी पैसे दिले नाहीत. त्यामुळे माळी व इतरांनी इंदिरानगर पोलिसांकडे दोघांविरोधात फिर्याद दाखल केली आहे.
माळी यांच्या फिर्यादीनुसार, संशयितांनी घेतलेले पैसे जमीन विकसित करण्यासाठी न वापरता फॉरेक्स ट्रेडींगमध्ये वापरल्याचे उघड झाले आहे. संशयित अमीत आष्टेकर याने वकिलामार्फत पाठवलेल्या नोटीसीत त्याने स्वत:च ही कबुली दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यामुळे अल्पावधीत जादा पैसे मिळवण्याच्या प्रयत्नात संशयितांनी गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक केल्याचे समोर येत आहे.