

Ambernath child abuse CCTV
अंबरनाथ: अंबरनाथच्या पालेगाव भागातील पटेल झिऑन या गृह संकुलात एका १२ वर्षांच्या अल्पवयीन मुलाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. लिफ्टने घरी निघालेल्या या मुलाने लिफ्टचा दरवाजा बंद केल्याच्या रागातून एका रहिवाशाने त्याला मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर संताप व्यक्त केला जात आहे.
दरम्यान ४ जुलैला ही घटना घडलेली असताना देखील मुलाच्या पालकांनी तक्रार करून पोलिसांनी या घटनेकडे दुर्लक्ष केले आहे. तीन दिवस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप मुलाच्या पालकांनी केला आहे. शंकरलाल पांडे यांच्या १२ वर्षाचा मुलगा ४ जुलैला सायंकाळच्या सुमारास ट्युशनहुन लिफ्टने आपल्या घरी जात होता. तो १४ व्या मजल्यावर राहतो. मात्र, ९ व्या मजल्यावर लिफ्ट आल्यानंतर लिफ्ट थांबली, आणि लिफ्टचे दरवाजे उघडले. मात्र, त्यावेळेस या मुलाला समोर कोणीही न दिसल्याने त्याने लिफ्टचा दरवाजा बंद केला. मात्र, त्याच वेळेस ९ व्या मजल्यावर राहणारे कैलाश थवानी हा लिफ्टमध्ये आला आणि लिफ्टचा दरवाजा बंद केल्याच्या रागातून त्या मुलाला मारहाण केली.
यावेळी त्याने या अल्पवयीन मुलाच्या हाताचा चावा घेण्याचा प्रयत्न केला. इतकेच काय हा मुलगा तळ मजल्यावर आल्यानंतर देखील थवाणी यांनी त्याला मारहाण केली. यावेळी तिथल्या रहिवाशांनी आणि सुरक्षारक्षकांनी त्या लहान मुलाला वाचवले. या प्रकरणी अंबरनाथ शिवाजी नगर पोलीस ठाण्यात मुलाच्या पालकांनी तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या संपूर्ण घटनेमुळे गृह संकुलात रहिवाशांतून संताप व्यक्त केला जात आहे.