

Gold Ring Stolen
उल्हासनगर : पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका 59 वर्षीय व्यक्तीला 'पोलीस' असल्याचे भासवून दोन अज्ञात आरोपींनी त्यांच्या हातातील सोन्याची अंगठी काढून घेतली. ही घटना शुक्रवारी, ८ ऑगस्ट रोजी रात्री ८.३० च्या सुमारास व्हिनस चौक ते गॅलेक्सी मॉल, अंबरनाथ दरम्यान घडली.
तुकाराम चंद्रकांत कदम(५९) हे शुक्रवारी रात्री व्हिनस चौकातून खेमाणी मार्ग जाणाऱ्या बसने प्रवास करत होते. त्याचवेळी एका अज्ञात इसमाने त्यांना 'मी पोलीस आहे, तुम्ही मोबाईल फोडलेला आहे, गाडीतून खाली उतरा' असे सांगितले. त्यामुळे घाबरून तुकाराम कदम हे बसमधून खाली उतरले.
त्यानंतर, त्यांच्यासोबत असलेल्या दुसऱ्या इसमाने एक रिक्षा थांबवून त्यांना रिक्षात बसवले. लालचक्की चौक, कालीमाता चौक, संभाजी चौक, भाटिया चौक आणि कैलास कॉलनी अशा विविध ठिकाणी रिक्षा फिरवत त्यांनी तुकाराम कदम यांच्याशी बोलणी केली. 'आम्ही पोलीस आहोत' असे सांगून आरोपींनी त्यांच्या हातातील स्टार डिझाइन असलेली ४ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी काढून घेतली आणि त्यांची फसवणूक केली.
या प्रकरणी तुकाराम कदम यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(४), ११५(२), ३५१(२), ३(५) नुसार दोन अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक कुलकर्णी हे करीत आहेत.