

वाशी : नवी मुंबई महानगरपालिका परिवहन सेवेची (एनएमएमटी) बस ट्रॅकर ॲपची सेवा तांत्रिक कारणांमुळे मागील पाच दिवसांपासून बंद पडली आहे. या ॲपचे सॉफ्टवेअर कालबाह्य होत आले आहे. तसेच संबंधित कंपनीचे कंत्राटही संपुष्टात आले आहे.
आधीच अपुऱ्या बसअभावी प्रवाशांना नाहक त्रास सोसावा लागत असताना कशीतरी चालू असलेली ही बस ट्रॅकर ॲप सेवाही आता कोलमडली आहे. त्यामुळे प्रशासनाची अकार्यक्षमता चव्हाट्यावर आली आहे.
उपक्रमाच्या आयटीएमएस सेवेअंतर्गत हा ॲप कार्यरत असून ही सेवा अद्ययावत करण्याकरिता केंद्र शासनाकडून एनएमएमटी प्रशासनाला मागील आर्थिक वर्षात कोट्यवधी रुपयांचा विशेष निधी उपलब्ध झाला आहे; परंतु अनेक महिन्यांपासून निविदे संदर्भात केवळ कागदी घोडे नाचवण्यापलीकडे प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही झाली नसल्याचे समजते. याप्रकरणी थेट आयुक्तांनीच लक्ष घालून आयटीएमएस प्रणालीच्या निविदेचा आढावा घेऊन ही सेवा अद्ययावत करण्याचे काम लवकरात लवकर चालू करून प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.
एनएमएमटी प्रशासनाने काही वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करत बस ट्रॅकर ॲप सेवा चालू केली होती. काही वर्षे ही सेवा सुरळीत चालू होती. त्यानंतर मागील दोन वर्षांपासून या सेवेचा बोऱ्या वाजला आहे. काही महिन्यांपूर्वीदेखील अशाच प्रकारे या ॲपची सेवा तांत्रिक कारणामुळे बंद पडली होती. आता पुन्हा तीच परिस्थिती उद्भवली आहे.
आता तर 5 दिवसांपासून ॲप बंद असल्यामुळे प्रवाशांना बस किती वाजता येते, त्याचप्रमाणे बस कुठे आहे, याची माहिती मिळत नाही. त्यामुळे प्रवाशांना बसथांब्यावर जाऊन ताटकळत बसची वाट पाहावी लागत आहे. काही तांत्रिक कारणास्तव ॲप बंद असून लवकरच ते पुन्हा चालू होईल, असे एन.एम.एम.टी.च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
समस्या काय
ॲप चालू असताना देखील जीपीएस लोकेशननुसार बस वेळेवर येत नाही.
अनेकदा काही मार्गावरील बस ॲपमध्ये दिसतात नंतर थोड्या वेळाने पुन्हा पाहिले असता या बस ॲपमधून गायब होतात.
अनेक मार्गांवरील बसेस ना जीपीएस सिस्टीम बसवली नसल्याने त्या मार्गावरील बसेस दिसत नाहीत.