

डोंबिवली : रूग्णाच्या मृत्यूनंतर लग्नाचे अमिष दाखवून त्याच्या पत्नीशी विवाहबाह्य संबंध ठेवून दगा देणाऱ्या अंबरनाथवासिय डॉक्टरच्या विरोधात मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ५२ वर्षीय आरोपी मुंबईतील एका प्रसिध्द रूग्णालयात अस्थिरोग तज्ज्ञ आहे. या डॉ क्टरने डोंबिवलीत राहणाऱ्या एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढळले. या महिलेचा विश्वास संपादन करून तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर आपल्याकडून चूक झाल्याचे सांगून लग्न करण्यास नकार देऊन तिची फसवणूक केली. या प्रकरणी पिडीत महिलेने पोलिस ठाण्यात या डॉक्टरच्या विरोधात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
डोंबिवलीत राहणारी ४९ वर्षीय तक्रारदार महिला इमारतीच्या देखभाल/दुरूस्तीचा व्यवसाय करते. तिच्या बाबतीत सन २०२३ ते २०२४ या कालावधीत फसवणुकीचा प्रकार घडला आहे. या संदर्भात महिलेने मानपाडा पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीनुसार पती हदयरोगाने ग्रस्त होते. त्यांच्या पायाला गँगरीन झाले होते. अधिक उपचारासाठी या महिलेने तिच्या पतीला ठाण्यातील एका प्रसिध्द रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी पतीचे गुडघ्याखाली दोन्ही पाय कापावे लागतील, असे सांगितले. त्यानुसार मुंबईत प्रसिध्द रूग्णालयात ठाण्यातील रुग्णालयात मानद सेवा देणार्या एका अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टरने यशस्वी शस्त्रक्रिया केली. त्यानंतर पतीच्या रूग्ण सेवेच्या माध्यमातून या डॉक्टरशी संबंध आला. पतीचे औषधोपचार व काही मार्गदर्शनासाठी पिडीत महिलेने संपर्क केला की संबंधित डॉक्टर पीडित महिलेच्या डोंबिवलीतील घरी येऊन पतीला तपासून निघून जात असत.्दसवगनोतग
पतीची तब्येत खालावल्याने मे २०२१ मध्ये त्यांचे निधन झाले. त्यानंतर संबंधित अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर या महिलेच्या प्रकृतीची नियमित विचारपूस करायचे. पुण्यात वैद्यकीय शिक्षण घेणारा या महिलेचा मुलगा डोंबिवलीत आल्यानंतर त्यालाही घरी येऊन डॉक्टर दोन ते तीन तास मार्गदर्शन करत असत. त्या निमित्ताने घरी चहा, जेवण होते असे. तक्रारदार महिलेचा मुलगा बाहेरगावी शिक्षण घेत असल्याची माहिती डाॅक्टरांना होती. एक दिवस घरात एकटी असताना डाॅक्टरांनी काही बोलायचे आहे असे बोलून माझे तुझ्यावर प्रेम आहे. मला तुझ्यासोबत राहायचे आहे. माझे पत्नीशी पटत नाही. मी लवकरच तिला घटस्फोट देणार आहे, असे सांगितले. यावर तक्रारदार महिलेने विश्वास ठेवला. त्यानंतर त्यांनी मनाविरूध्द जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचे पिडीत महिलेने तिच्या फिर्यादीत म्हटले आहे.
तुम्ही विवाहित आहात. तुम्हाला मुली आहेत. तुम्ही करता ते योग्य नाही, असे सांगूनही डाॅक्टरांनी मुली परदेशात जाणार आहेत. त्यामुळे आपण लग्न करू, संसार करू, तुझ्या मुलालाही परदेशात शिक्षणासाठी पाठवू, अशा थापा मारून डॉक्टरांनी पिडीत महिलेचा विश्वास संपादन केला. काहीतरी निमित्त काढून डाॅक्टर आपल्या घरी येत असत. पत्नीशी आपले पटत नाही असे बोलून आपल्याशी शारीरिक संबंध ठेवत असत. दहा महिन्यांच्या कालावधीत आठवड्यातून डॉक्टर तीन-चार वेळा घरी येत होते. आपण लग्न करू, असे अमिष दाखवून दाखविणाऱ्या डॉक्टरांच्या पत्नीने फेब्रुवारी २००४ रोजी अचानक पिडीत महिलेशी संपर्क साधला. माझे मिस्टर तुमच्याकडे आले आहेत का ? या प्रश्नावर पिडीत महिलेने होय म्हणून सांगितले. बाजुला उभ्या असलेल्या डाॅक्टरांनी त्याच मोबाईलवर समोर येऊन माझी चूक झाली. मी तुला यापुढे भेटणार नाही. तुझ्याशी लग्न करणार नाही, असे बोलून मोबाईलबंद केला.
या घटनेनंतर पिडीत महिलेला धक्का बसला. ती मानसिक आजाराने ग्रस्त झाली. ठाण्यातील प्रसिध्द रूग्णालयात या महिलेने मानसिक आजारावर उपचार घेतले. या आजारातून बाहेर पडल्यावर पीडित महिलेने मुंबईतील प्रसिध्द रूग्णालयातील ५२ वर्षाच्या अस्थिरोग तज्ज्ञ असलेल्या डाॅक्टर विरूध्द तक्रार दिली. ही तक्रार डोंबिवलीतील मानपाडा पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आली आहे. अंबरनाथमधील असलेल्या आरोपी डॉक्टरांना अद्याप अटक करण्यात आली नसून वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीपान शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.