

अंबरनाथ (ठाणे) : प्राचीन शिवमंदिर परिसरातून वाहणार्या वालधुनी नदी पात्रात काठावर साठलेल्या पाण्यामुळे या पाण्याला आता दुर्गंधी सुटल्याने, प्राचीन शिव मंदिर परिसरात येणार्या भक्तांना नाकावर रुमाल ठेवून रांगेत उभे राहण्याची वेळ येत आहे. या सगळ्या प्रकाराकडे अंबरनाथ नगरपरिषदेने लक्ष घालण्याची मागणी आता पुढे येत आहे.
फुटलेल्या ड्रेनेज लाईन व वालधुनी नदी पात्रात सोडलेल्या ड्रेनेज लाईन यामुळे प्राचीन शिव मंदिर परिसरात दुर्गंधी पसरली होती. यावर तोडगा म्हणून काही वर्षांपूर्वी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने अंबरनाथ नगरपरिषदेने प्राचीन शिवमंदिर परिसरातून वाहणार्या वालधुनी नदीचे पाणी सिमेंटच्या मोठ्या पाईपमधून सोडण्याची व्यवस्था केली आहे.
मात्र या पाईपलाईनच्या काठावर पावसाचे पाणी साठून राहिले असल्याने व त्यामध्ये निर्माल्य व इतर पदार्थ टाकले जात असल्याने, या पाण्याला आता दुर्गंधी सुटली आहे. या पाण्याला वाहून जाण्याचा कोणताही मार्ग नसल्याने हे पाणी मागील काही महिन्यांपासून एकाच ठिकाणी साठलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे या पाण्याला मार्क काढून ही दुर्गंधी थांबवावी, अशी मागणी भाविकांमध्ये होत आहे.
तब्बल एक हजार वर्षे प्राचीन असलेल्या येथील शिव मंदिरात दर्शनासाठी श्रावण सोमवारी भाविकांची अलोट गर्दी उसळते. मंदिरात दर्शनासाठी वालधुनी नदीवर असलेला पूल पार करावा लागतो. त्यामुळे या पुलावर व या परिसरामध्ये भाविकांना रांगेमध्ये तासनतास उभे राहावे लागते. आधीच गैरसोयीने वेढलेल्या या परिसरात भाविकांना तुंबलेल्या पाण्याच्या दुर्गंधीचाही सामना करावा लागत असल्याने भाविकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. अंबरनाथ नगर परिषदेने येथील परिसर कायम स्वच्छ ठेवून दुर्गंधी पसरवणार्या पाण्याचा निचरा करावा, अशी मागणी आता भाविक करीत आहेत. शिव मंदिर परिसरात येणार्या भक्तांना नाकावर रुमाल ठेवून रांगेत उभे राहण्याची वेळ येत आहे.