ठाणे : पुढारी ऑनलाईन डेस्क - बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे याने पोलिसांच्या हातातील बंदूक हिसकावून गोळीबार केला आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नांत पोलिसांनी जो स्वरक्षणार्थ गोळीबार केला त्या गोळीबारात अक्षय शिंदेचा मृत्यू झाला आहे. हा एन्काऊंटर दुर्लक्षित कारभारामुळे झाला आहे असा आरोप विरोधकांकडून होत आहे. तर अक्षय शिंदेची आई म्हणतेय की, आम्ही "अक्षयचा मृतदेह ताब्यात घेणार नाही".
मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूर मधील लोकांनी अक्षय शिंदेच्या कुटुंबीयांना गावातून हुसकावून लावल होते. त्याच्या घराची तोडफोड देखील करण्यात आली होती. अक्षय हा २४ वर्षांचा असून त्याची तब्बल तीन लग्न झाली आहेत. पण एकही पत्नी त्याच्यासोबत नांदायला राहत नव्हती. अक्षय शिंदेच्या दुसऱ्या पत्नीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी त्याच्या विरोधात अनैसर्गिक लैंगिक संबंध प्रस्थापित केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्याची प्रक्रिया केली होती. सोमवारी (दि.23) सायंकाळी पोलीस त्याला तळोजा कारागृहातून बाहेर घेऊन जात असताना त्याने वाहनात शेजारी बसलेल्या सहायक पोलिस निरीक्षक नीलेश मोरे यांचे रिव्हॉल्वर हिसकावून गोळीबार केला. यात निलेश मोरे गंभीर जखमी झाले. अक्षय पळून जाण्याची भीती असल्याने सीआययूचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी त्यांच्या रिव्हॉल्वरमधून अक्षय शिंदेच्या दिशेने तीन गोळ्या झाडल्या. त्यात तो गंभीर जखमी झाला. कळवा महापालिका रुग्णालयात नेल्यानंतर तो मरण पावल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले आहे.
संजय शिंदे हे बदलापुर बलात्कार प्रकरणाच्या तपासासाठी गठीत केलेल्या विशेष तपास पथकाचे (SIT) अधिकारी आहेत. त्यांनी आपल्या करिअरमध्ये प्रदीप शर्मा यांच्या सोबत काम केलेले आहे, त्यांचे नाव देशातील प्रसिद्ध एन्काऊंटर स्पेशलिस्टमध्ये घेतले जाते.
“आम्ही अक्षयचा मृतदेह ताब्यात घेणार नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी. आमच्या मुलाने साधे फटाके फोडले नाही. तो बंदूक खेचून गोळीबार कसा करू शकतो? शाळा प्रशासनाच्या दबावातून हे करण्यात आले आहे. सोमवारी, दि.23 रोजी दुपारी आमची अक्षय याच्यासोबत तळोजा कारागृहात भेटही झाली होती. आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही.” आमचा मुलगा निर्दोष असून त्याना या प्रकरणात फसवण्यात आले असल्याचा आरोप आई-वडीलांनी केला आहे. त्यांनी पोलिस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार देखील दाखल केली होती.