KDMC Water Supply Issue | केडीएमसीचा पाणी पुरवठा विभाग कोमात

आजदे गावात नियमबाह्य पद्धतीचे पाण्याचे वितरण; जयराम स्मृतीतील त्रस्त रहिवासी आंदोलनाच्या पावित्र्यात
KDMC News
KDMC Water Supply Issue(Pudhari File Photo)
Published on
Updated on

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या भावना बोथट झाल्याचे आजदे गावातील जयराम स्मृती इमारतीला होणाऱ्या शून्य पाणी पुरवठ्यावरून सिद्ध झाले आहे. जलवाहिनीच्या शेवटच्या टोकाला असलेल्या या इमारतीपर्यंत पाणी पोहोचत नसल्याने रहिवाशांच्या संतापाचा कडेलोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कायमस्वरूपी तोडगा काढण्यात पाणी पुरवठा विभागाला यश येत नसल्याने संतापात अधिकच भर पडत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पाण्यावाचून हलकीचे दिवस काढणाऱ्या या इमारतीत राहणाऱ्या २१ कुटुंबियांना आंदोलनाचे हत्यार उपसण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.

डोंबिवलीला लागून असलेल्या आजदे गावातील जयराम स्मृती इमारतीला नियमाप्रमाणे दोन लाईन जोडल्या आहेत. पाण्याचा थांगपत्ता नसतानाही या इमारतीतील रहिवासी विहित वेळेत पाण्याचे बिल भरतात. या इमारतीत २१ कुटुंबे राहत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या कुटुंबीयांना कधीही पुरेसे पाणी मिळाल्याचे ऐकिवात नाही.

मुबलक पाऊस झाल्याने धरणांमध्ये पुरेसा पाणी साठा असतानाही जयराम स्मृतीला तळ टाकीत फूटभर देखील पाणी जमा होत नाही. त्यामुळे या इमारतीतील रहिवासी घरटी वर्गणी काढून टँकर मागवतात. तसेच अनेक कुटुंबे तर वैयक्तीक छोटे टँकर मागवून कसेबसे जीवन कंठत आहेत. पाण्याचा थांगपत्ता नसल्याने मुक्काम तर दूरच, पण पाहुण्यांना घरी बोलविण्याची तर सोयच उरलेली नाही.

केडीएमसीकडून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या लाईनला या भागातील अनेक इमारतींनी दोन पेक्षा अधिक लाईन आणि त्याही मोठ्या व्यासाच्या लावून त्या जमिनीत दडपून घेतल्याचे आढळून येते. परिणामी शेवटच्या टोकाला असलेल्या जयराम स्मृतीला बादलीभरही पाणी येत नसल्याची या इमारतीतील रहिवाशांची गंभीर तक्रार आहे.

KDMC News
Dombivali Woman Harassment | "तू मला आवडतेस..."म्हणत उत्तर भारतीय दारूड्याने केला महिलेचा छळ, मराठी रणरागिणीचे चोख प्रत्युत्तर

महानगरपालिकेकडून कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे इमारतीची तळटाकी जेमतेम एक ते दीड फूट भरते. या भागातील एकेका इमारतींमध्ये कमीत कमी २५ कुटुंबे राहत आहेत. या कुटुंबीयांना पाणी पुरत नाही. त्यामुळे या भागातील अनेक इमारतींना नियमबाह्य लाईन जोडून घेतल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. जयराम स्मृतीला तर केडीएमसीच्या टँकरवर अवलंंबून रहावे लागत असल्याच्या रहिवाश्यांनी तक्रारी केल्या. जोपर्यंत पाईप लाईनद्वारे पाणी येत नाही तोपर्यंत केडीएमसीने आमच्या इमारतीला मोफत टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा, अशीही मागणी रहिवाशांनी केली आहे.

मीटर जोडून हवा मोजायची का ?

पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी तर जमराम स्मृती इमारतीतील रहिवाशांना नेहमी ठेंगा दाखवला आहे. कायमस्वरूपी तोडगा काढण्याऐवजी पाण्याचे मीटर बसवून घ्या, असा सल्ला या विभागाचे कार्यकारी अभियंता शैलेश कुलकर्णी यांनी दिला. मुळात इमारतीच्या तळ टाकीला जोडलेल्या लाईनला पाण्याचा थेंबही येत नसताना मीटर जोडून हवा मोजणार का ? असा सवाल रहिवाशांनी उपस्थित केला. कार्यकारी अभियंता शैलेश मळेकर यांनी बघू आणि करू व्यतिरिक्त कोणतीही ठोस उपाययोजना केली नाही. वारंवार तक्रारी करूनही अधिकारी मंडळी पाणी प्रश्न सोडविण्याऐवजी टोलवाटोलवी करत असल्याने रहिवाशांच्या संतापात अधिकच भर पडत आहे.

KDMC News
KDMC election : केडीएमसी आगामी पालिका निवडणुकीची अंतिम प्रभाग रचना जाहीर

रहिवाशांचे आरोग्य धोक्यात

दिवाळी सण कसाबसा साजरा केला. आतातर पाणी टंचाईची झळ अधिक प्रमाणात बसू लागली आहे. रहिवाशांमध्ये पाणी टंचाई विषयीचा तक्रारीचा सूर वाढू लागला आहे. दिवाळी सणात सुट्ट्या असताना पाहुण्यांना घरी बोलवायचे कसे ? असा प्रश्न रहिवाशांना पडला होता. दिवाळी संपल्यानंतरही परिस्थितीत सुधारणा झाली नाही. प्यायला पाणी नाही, तर अंघोळ आणि स्वच्छतेसाठी कुठून ? असा सवाल उपस्थित करणाऱ्या रहिवाश्यांचे आरोग्य देखिल धोक्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news