

Sahar Shaikh Caste Certificate Case: ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत “कैसा हराया…” या डायलॉगमुळे राज्यभर चर्चेत आलेल्या AIMIMच्या नगरसेविका सहर शेख आता वादात सापडल्या आहेत. त्यांच्या नगरसेवकपदावरच प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सहर शेख यांनी निवडणूक लढवताना सादर केलेल्या जात प्रमाणपत्राबाबत गंभीर आक्षेप नोंदवण्यात आले आहेत. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, हे प्रमाणपत्र बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवण्यात आले असून संबंधित शासकीय यंत्रणांची दिशाभूल करण्यात आली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या संपूर्ण प्रकरणात सर्वात गंभीर बाब म्हणजे निवडणूक प्रक्रियेदरम्यान एक नव्हे, तर चार वेगवेगळ्या शासकीय यंत्रणांना चुकीची माहिती देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. जर हे आरोप सिद्ध झाले, तर त्याचा थेट परिणाम त्यांच्या निवडणुकीवर आणि पदावर होऊ शकतो.
या प्रकरणात सहर शेख यांचे वडील युनूस शेख यांच्यावरही आरोप आहेत. मूळचे उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील असलेल्या युनूस शेख यांनी महाराष्ट्रात स्थलांतर केल्यानंतर, नियमानुसार वेगळा नमुना लागू असतानाही दुसरा नमुना वापरून जात दाखला मिळवल्याचा आरोप आहे. याच दाखल्याच्या आधारे सहर शेख यांनी पुढे मुंबईतील जिल्हाधिकारी कार्यालयातून प्रमाणपत्र घेतल्याचे सांगितले जात आहे.
या प्रकरणावर ठाणे तहसील कार्यालयात सुनावणीही झाली आहे. सुनावणीदरम्यान सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये काही त्रुटी आढळल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, ठाण्याच्या रहिवासी असूनही मुंबईतून जात प्रमाणपत्र का घेतलं, यावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
सहर शेख या AIMIM पक्षाच्या नगरसेविका असून त्यांनी 2026 मधील ठाणे महापालिका निवडणुकीत मुंब्रा प्रभाग क्रमांक 30 मधून विजय मिळवला होता. निवडणुकीदरम्यान त्यांनी आक्रमक प्रचार करत स्थानिक राजकारणात जोरदार एंट्री केली होती आणि त्यांच्या भाषणाच्या स्टाईलमुळे त्या चर्चेत आल्या होत्या.
सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू असून, आरोप सिद्ध झाले तर सहर शेख यांचे नगरसेवकपद धोक्यात येऊ शकते. राजकारणात आत्ताच एंट्री केलेल्या सहर शेख आता कायदेशीर अडचणीत सापडल्या आहेत. पुढील काही दिवसांत या प्रकरणात मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.