

डोंबिवली : गुजरात राज्यातील अहमदाबादमध्ये गुरूवारी झालेल्या एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेत डोंबिवलीकर रोशनी सोनघरे हीचा मृत्यू झाल्याचे वृत्त हाती आले आहे. पूर्वेकडील राजाजी रोडला असलेल्या मढवी बंगला परिसरात राहणारी २७ वर्षीय फ्लाईट क्रू रोशनी सोनघरे हीचा मृत्यू झाल्याची खबर डोंबिवलीत येऊन आदळताच समाजमाध्यमांवर अनेकांनी तिला श्रद्धांजली अर्पण केली. तर भाजपाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण यांनी देखिल समाजमाध्यमांवर शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली.
अहमदाबाद-लंडन या एअर इंडियाच्या विमानाला गुरुवारी दुपारी अपघात झाला. या दुर्घटनेत २४२ प्रवासी मृत्यूमुखी पडले. याच विमानात फ्लाईट क्रू मेंबर रोशनी राजेंद्र सोनघरे ही देखिल कर्तव्यावर होती. रोशनी कर्तव्यावर असलेल्या विमानाचा अपघात झाल्याचे कळताच तिचे वडील राजेंद्र, आई आणि भाऊ अहमदाबादला रवाना झाले.
रोशनी सोनघरे ही राजाजी रोडला असलेल्या मढवी बंगल्यामागील न्यू उमिया कृपा सोसायटीत वडील राजेंद्र, आई राजश्री आणि भाऊ विघ्नेश यांच्यासह एकत्रच राहत होती. मुंबईतील ग्रँड रोड परिसरात राहणारे हे कुटुंब दोन वर्षांपूर्वी डोंबिवलीत स्थायिक झाले होते. रोशनीचा भाऊ विघ्नेश हा एका खासगी शिपिंग कंपनीमध्ये काम करतो. तर आई आणि वडील दोघेही घरीच असतात. रोशनीचे शिक्षण मुंबईत झाले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राजेंद्र सोनघरे व त्यांचे पत्नी राजश्री हिने आपल्या दोन्ही मुलांना शिकवले. रोशनीनला लहानपणापासूनच एअर क्रु बनायचे होते. रोशनीने जिद्द आणि मेहनत करत स्वप्न पूर्ण केले. बुधवारी आई-वडिलांचा निरोप घेऊन ती अहमदाबादला गेली व अहमदाबादच्या फ्लाईटने ते लंडनच्या दिशेने निघाली होती. तथापी याच विमानाचा अपघात झाला आणि त्यात डोंबिवलीकर रोशनीची देखिल प्राणज्योत मावळली.
स्काय लव्हर हर या नावाने रोशनी इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध आहे. तब्बल ५४ हजार तिचे फॉलावर्स आहेत. एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेत डोंबिवलीकर रोशनी सोनघरे हीचा मृत्यू झाल्याचे समजताच भाजपाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण यांनी राज्य सरकारच्या आपत्कालीन विभागाशी संपर्क साधून माहिती घेण्यासह रोशनीच्या कुटुंबीयांना सर्व प्रकारचे सहाय्य करण्याच्या दृष्टीने शासनस्तरावरून हालचाली सुरू केल्या. तर दुसरीकडे सोनघरे कुटुंबीय राहत असलेल्या न्यू उमिया कृपा सोसायटी परिसरात अनेकांनी धाव घेतली. डीएनए टेस्ट झाल्यानंतर रोशनीचा मृतदेह अहमदाबादहून मुंबईमार्गे डोंबिवलीत आणण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.