उल्हासनगर; पुढारी वृत्तसेवा : बिगारी काम करणाऱ्या तरुणाने प्रेयसीला घेऊन दिलेल्या महागड्या मोबाईलचे कर्ज फेडण्यासाठी वडिलांकडून पैसे उकलण्यासाठी अपहरणाचा बनाव रचला. मात्र मध्यवर्ती पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि कर्नाटक पोलिसांच्या मदतीने अपहरण झालेल्या तरुणाला ताब्यात घेत बनाव उघड केला.
उल्हासनगर कॅम्प 3 मधील शांतीनगर येथील काकाच्या धाब्याजवळ जयश्री टिंबर ट्रेडिंग कंपनी मध्ये सोनू हरिराम भारती हे काम करतात. त्यांचा पुतण्या विजयकुमार चंद्रभान भारती (वय 22) हा 14 ऑगस्टला रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास चिकन आणण्यासाठी गेला असता तो उशीरापर्यंत घरी आला नाही. त्यानंतर रात्री दीड वाजण्याच्या सुमारास विजयकुमार याचे वडील चंद्रभान भारती यांना अज्ञात इसमाने मोबाईल वरुन फोन करून "जय तुम्हारा कौन है और उसकी सलामती चाहते हो तो २ लाख रूपये दो नहीं तो उसे मार दूंगा ? " व " जल्दीसे पैसेका इजताम करो नही तो उसे मार दूंगा और इस बारे में पुलिस को पता नही चलना चाहिए " अशी धमकी देवून २ लाख रुपयांची खंडणीची मागणी केली.
याप्रकरणी मध्यवर्ती पोलिसानी अपहरणाचा गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला. मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर कोकरे यांनी गुन्हयाचे गाभीर्य ओळखुन तपासाची सूत्रे हाती घेवून मोबाईलचे लोकशन मिळवले. हे लोकेशन उद्यान एक्स्प्रेसने बँगलोरच्या दिशेने जात असल्याचे समजताच कर्नाटक रेल्वे पोलिसांशी संपर्क साधून विजयचा फोटो पाठवला. मात्र त्यांना यश प्राप्त झाले नाही.
तात्काळ ईश्वर कोकरे व पोलीस नाईक दिपक पाटील यांना तात्काळ कनार्टक येथे रवाना केले. त्यानंतर मोबाईल नंबरचे कॉल रेकॉर्ड प्राप्त केले. कल्याण रेल्वे स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये विजयकुमार हाच कल्याण रेल्वे स्टेशनवर एकटाच फिरताना व एक्सप्रेसमध्ये बसुन जात असल्याचे दिसून आले. त्यावरून सदरचा बनाव हा विजयकुमार यानेच रचला असल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर तांत्रिक तपासाच्या आधारे विजयकुमार याला बुधवारी कर्नाटक मधील रायचूर रेल्वे स्टेशन येथे रेल्वे सुरक्षा दलाचे पोलीस निरीक्षक कल्याण मोरे, रायचूरचे पोलीस निरीक्षक अभिषेक कुमार यांनी ताब्यात घेतले. त्यानंतर पोलीस हवालदार दत्तू जाधव, प्रविण पाटील, पोलीस नाईक संदिप शिरसाट, दीपक पाटील, बाबासाहेब ढाकणे, अरविंद पवार, किरण चौधरी यानी रायचूर गाठत विजयचा ताबा घेत उल्हासनगरला आणले. विजयकुमार याचेकडे केलेल्या चौकशीमध्ये व गुन्ह्याचे तपासामध्ये विजयकुमार भारती यास पैश्यांची गरज असल्यामुळे त्याने कर्ज घेतले होते, त्याची परतफेड करण्यासाठी स्वतःचे अपहरणाचा बनाव केला असल्याचे निष्पन्न झाले असल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यानी दिली. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस निरीक्षक सुहास आव्हाड हे करीत आहेत.
५० रुपयांसाठी अनोळखी व्यक्तींनी केला धमकीचा फोन
विजय याने घेतलेल्या नवीन मोबाईल क्रमांकावरून दोनदा विजयच्या वडिलांना धमकीचा फोन आला. हा फोन त्याने रेल्वे स्थानकावर अनोळखी व्यक्तींना धमकीचा फोन करण्यासाठी 50 रुपये दिल्याचे तपासात सांगितल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त मोतीचंद राठोड यानी दिली.