

ठाणे, पुढारी वृत्तसेवा : ठाणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती व सदस्यांचा कार्यकाळ दिनांक १४ जानेवारी रोजी संपणार आहे. तर शहापूर, मुरबाड, कल्याण, भिवंडी व अंबरनाथ या पाच पंचायत समित्यांचे सभापती व पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ ७ जानेवारी रोजी संपुष्टात येईल. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या आगामी निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील पंचायत समित्यांवर ७ जानेवारीपासून तर, जिल्हा परिषदेवर १४ जानेवारीपासून प्रशासकीय राजवट येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्याच्या ग्रामविकास विभागाने याबाबत अधिसूचना जाहीर केली आहे.
पंचायत समित्यांच्या प्रशासकपदी आपापल्या पंचायत समितीचे गट विकास अधिकारी तर, जिल्हा परिषदेवर मुख्य कार्यकारी अधिकारी हे प्रशासक म्हणून कारभार पाहणार आहेत. यामुळे ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांची प्रशासकपदी नियुक्ती करण्यात येणार आहे. ठाणे जिल्हा परिषदेवर प्रशासकीय राजवट लागण्याची ही आठवी वेळ असणार आहे.
पंचायतराज संस्थांना अधिकाधिक स्वायत्तता देण्यासाठी आणि केंद्र व राज्य सरकारच्या अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्यासाठी केंद्र सरकारने ७३ वी घटनादुरुस्ती केली होती. या घटनादुरुस्तीतील नियमांची अंमलबजावणी १९९४ पासून केली जात आहे. तरतुदीनुसार पंचायतराज संस्थांच्या निवडणुका दर पाच वर्षांनी घेण्याचे बंधनकारक आहे. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या पदाधिकाऱ्यांना आणि सदस्यांना मुदतवाढ देता येत नाही. विद्यमानांना मुदतवाढ देण्यात असलेल्या कायदेशीर अडचणी आणि मुदतीत निवडणुका घेणे अशक्य असल्याने या संस्थांवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात येत आहे.