ठाणे : पुढारी वृत्तसेवा : ठाणे महापालिकेचे वादग्रस्त सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांची चौकशी होईपर्यंत त्यांचा कार्यभार काढण्यात येईल, अशी ग्वाही अधिवेशनात खुद्द उद्योगमंत्री उदय सामंत यांनी देऊनही आहेर यांचा कार्यभार कायम असल्याचे ट्विट माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. आहेर यांचा कार्यभार कायम ठेवल्याने हा विधिमंडळाचा अवमान असल्याचे आव्हाड यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे. त्यामुळे ठाणे महापालिका प्रशासन चांगलेच अडचणीत आले आहे.
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीकडून आहेर यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल करण्यात आली होती. यात आव्हाड यांच्या कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी त्यात देण्यात आली होती. या ऑडिओ क्लिपनंतर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आहेर यांना महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर माहराण केली होती. त्यानंतर आव्हाड यांच्यासह त्यांच्या काही पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर आहेर यांच्या विरोधात कारवाईची मागणी देखील राष्ट्रवादीने पोलिसांकडे केली होती. दरम्यान या संदर्भात काँग्रेसचे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी देखील आपल्या कुटुंबियांना आहेर यांच्याकडून धोका असल्याचे सांगितले होते. तर या संदर्भात अधिवेशनात देखील चर्चा झाली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी सीआयडीमार्फत केली जाईल, असे आश्वासन दिले होते. तर चौकशी होईपर्यंत त्यांचा पदभार काढण्याचे आश्वासनही अधिवेशनात मंत्री उदय सामंत यांच्याकडून देण्यात आले होते.
अधिवेशनात हा विषय झाल्यानंतर ठाणे महापालिकेने त्यांच्याकडील कार्यालयीन उपअधीक्षक व त्यांच्याकडे असलेले कार्यालयीन अधीक्षक या पदाचा असलेला अतिरिक्त कार्यभार काढून घेतला आहे. परंतु त्यांच्याकडील अतिक्रमण विभागाचा सहाय्यक आयुक्त पदाचा कार्यभार तसाच ठेवला आहे. त्यावरुन आता पुन्हा रान पेटणार असल्याचेच दिसत आहे. या संदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करीत हा तर विधीमंडळाचा अपमान आहे. पत्रात स्पष्ट नमूद आहे की, सर्व पदभार काढून घेण्यात यावे. पण मुख्यमंत्री सांगतात फक्त एक पदभार काढा, विधीमंडळाच्या कामकाजात झालेल्या चर्चेनंतर मुख्यमंत्री त्यात हस्तक्षेप करतात, महाराष्ट्रात हे कधीच घडले नव्हते. अधिकाऱ्यांनी आपले काम केले. पण मुख्यमंत्र्यांनी विभागास वेगळ्या सुचना केल्या, असे विभागाच्या पत्रात नमूद केले आहे. इतकी पाठराखण का? असा प्रश्नही आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये उपस्थित केला आहे.
हेही वाचा