

डोंबिवली : कल्याण-कसारा रेल्वेमार्गावरील महागणपतीच्या टिटवाळ्याजवळ असलेल्या बल्याणी परिसरात नशेखोरांचा हैदोस दिवसेंदिवस वाढत चालला आहे. परिसरात एका नशेखोराने उधारीने सामान दिले नाही, म्हणून धारदार शस्त्राने हल्ला करून दुकानदार आणि त्याच्या भावाला जखमी केल्याची घटना घडली समोर आली आहे. आजूबाजूच्या लोकांनी मध्यस्थी केल्याने दुकानदाराचा जीव वाचला.
कल्याण-कसारा रेल्वेमार्गावरील आंबिवली ते टिटवाळा स्थानकांदरम्यानचा परिसर गर्दुल्ले, चिंधीचोर, गावगुंडांनी व्यापला आहे. बल्याणी परिसरात श्रीकांत यादव यांचे किराणा मालाचे दुकान आहे. या दुकानावर हसन शेख नावाचा तरूण आला. त्याच्यासोबत शाने अली नावाचा त्याचा साथीदारही होता. हसन शेख याने काही वस्तू मागितल्या. मात्र,दुकानादाराने यापूर्वीची उधारी आहे.ती उधारी आधी चुकती करा, असे सांगितल्याने संतापलेल्या शेख याने कमरेला खोचलेला चाकू काढून दुकानदार श्रीकांत यादव याच्यावर जीवघेणा हल्ला केला. यादव यांचे भाऊ रमाकांत हे वाद सोडविण्यासाठी आले असता शेख याने त्यांच्यावरही हल्ला केला. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत हल्लेखोराकडून चाकू हिसकावून घेतला. आसपासचे लोक धावून आल्याने दोघा भावांचा जीव वाचला. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हल्ल्यातून बचावलेला दुकानदार श्रीकांत यादव याने प्रसार माध्यमांशी बोलताना पोलिसांबद्दल तक्रार केली आहे. पोलिस या प्रकरणात गांभीर्य दाखवत नाहीत. माझी उधारी दिली नाही, म्हणून विचारणा केली असता माझ्यावर हल्ला करण्यात आला. परिसरात नशेखोरांनी हैदोस मांडला आहे. दररोज काही ना काही उपद्व्याप नशेखोर करत असतात. त्याचा या परिसरातील दुकानदार, व्यापारी आणि रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. आम्ही दोघेजण थोडक्यात बचावलो. अन्यथा, आम्ही जीवानिशी गेलो असतो. असेही श्रीकांत यादव यांनी सांगितले.