

टिटवाळा : मोहने येथील एन.आर.सी. कारखान्याच्या जागेवर अदानी समूहाच्या अंबुजा सिमेंट ग्राइंडिंग युनिट सुरू करण्याच्या प्रस्तावाला स्थानिक नागरिक, सामाजिक संघटना, शेतकरी संघटना तसेच विविध राजकीय पक्षांनी प्रखर विरोध दर्शविला.
अदानी समूहाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे परवानगी मागितल्यानंतर 12 सप्टेंबर रोजी हजारो नागरिकांनी कल्याण येथे जाऊन या प्रकल्पाविरोधात हरकती दाखल केल्या होत्या. त्यानंतर हरकतींवर सुनावणी घेण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तर्फे 16 सप्टेंबर रोजी सार्वजनिक सुनावणीचे आयोजन करण्यात आले. या सुनावणी दरम्यान नागरिकांनी, स्थानिक भूमिपुत्रांनी तसेच सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकमुखी विरोध नोंदवला. तसेच अधिकार्यांसमोर प्रकल्पाला विरोध असल्याचे एकमुखी जाहीर केले.
सुनावणीला उपस्थित नागरिकांनी या प्रकल्पामुळे परिसरात होणार्या प्रदूषणाचा, आरोग्य व शेतीवर होणार्या दुष्परिणामांचा मुद्दा अधिकार्यांसमोर ठामपणे मांडला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे श्याम दादा गायकवाड यांनी अदानी समूहाच्या प्रकल्पासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले. मात्र कंपनीच्या प्रतिनिधींना त्यांची समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत.
या सुनावणीला परिसरातील अनेक माजी नगरसेवक उपस्थित होते. त्यात महेंद्र गायकवाड, दया शेट्टी, मयूर पाटील, सुनंदा मुकुंद कोट यांचा समावेश होता. ग्रामस्थ मंडळ मोहोण्याचे अध्यक्ष सुभाष पाटील, अटाळी-आंबिवली गावचे भूमिपुत्र दशरथ पाटील, मारुती पाटील, रमन तरे यांनीही जोरदार आक्षेप नोंदविला.
काँग्रेस मोहणे ब्लॉक अध्यक्ष व भीमशक्ती सामाजिक संघटनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष राजेश वाघमारे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे. सी. कटारिया, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवा शहराध्यक्ष दिनेश जाधव, शहर सेक्रेटरी आनंद दीपक भाऊ निकाळजे सामाजिक संघटनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष योगेश गायकवाड सोनवणे, सोशल मीडिया प्रतिनिधी योगेश जाधव, उंभरणी गावचे नाना पवार, सुधीर कटारेनवते व सुशील आर.के. यांनीदेखील प्रकल्पाविरोधात भूमिका घेतली.
प्रकल्पामुळे गावकर्यांचे आरोग्य धोक्यात
स्थानिक रहिवाशांनी एकमुखीपणे मांडले की, हा प्रकल्प राबविण्यात आला तर परिसरातील पर्यावरणाचा मोठा र्हास होईल आणि गावकर्यांचे आरोग्य धोक्यात येईल. त्यामुळे हा प्रकल्प रद्द केला जावा अशी उपस्थित नागरिकांनी जोरदार मागणी केली आगामी काळात अदानी कंपनीच्या अंबुजा सिमेंट फॅक्टरीला नागरिकांचा विरोध पाहता प्रकल्पाला गाशा गुंडाळावा लागणार हेच नागरिकांच्या विरोधातून दिसून आले.