लग्‍नाळूंसाठी आनंदाची बातमी! नववर्षात मुहूर्तच मुहूर्त | पुढारी

लग्‍नाळूंसाठी आनंदाची बातमी! नववर्षात मुहूर्तच मुहूर्त

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : इंग्रजी महिन्यांनुसार भारतीय नववर्ष लागण्यासाठी चारच दिवस शिल्लक आहेत. यावर्षी शुक्रवार 31 डिसेंबर रोजी लीप सेकंद धरला जाणार नसल्याने नूतन वर्ष सन 2022 चा प्रारंभ शुक्रवारी रात्री ठीक 12 वाजता होणार आहे. 2022 मध्ये ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर असे तीन महिने वगळता उर्वरित 9 महिन्यांत विवाह मुहूर्त आहेत.

येत्या वर्षात आलेल्या 24 सुट्ट्यांपैकी 6 सुट्ट्यांचा दिवस रविवारी येत असल्याने चाकरमान्यांना या सुट्ट्यांवर पाणी सोडावे लागणार आहे. शिवाय नव्या वर्षात खगोलप्रेमींना ग्रहण तसेच सुपरमूनचे दर्शन होणार असल्याने त्यांच्यासाठी ही पर्वणी ठरणार असल्याची माहिती प्रसिद्ध खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली.

2022 मध्ये मिळणार्‍या 24 सुट्ट्यांपैकी श्रीरामनवमी 10 एप्रिल, महाराष्ट्र दिन 1 मे, बकरी ईद 10 जुलै, महात्मा गांधी जयंती 2 ऑक्टोबर, ईद ए मिलाद 9 ऑक्टोबर आणि ख्रिसमस 25 डिसेंबर अशा एकूण 6 सुट्ट्या रविवारी येत असल्याने चाकरमान्यांना या सुट्ट्यांवर पाणी सोडावे लागणार आहे.

2022 हे वर्ष लीपवर्ष नसल्याने वर्षात एकूण 365 दिवस काम करण्याची संधी मिळणार असल्याचे ते म्हणाले. या वर्षात दोन सूर्यग्रहणे आणि दोन चंद्रग्रहणे अशी एकूण चार ग्रहणे होणार आहेत. त्यापैकी मंगळवार 25 ऑक्टोबरचे खंडग्रास सूर्यग्रहण आणि मंगळवार 8 नोव्हेंबरचे खग्रास चंद्रग्रहण संपूर्ण भारतातून दिसणार आहे. मात्र शनिवार 30 एप्रिलचे खंडग्रास सूर्यग्रहण आणि सोमवार 16 मे रोजी होणारे खग्रास चंद्रग्रहण भारतातून दिसणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

4 जानेवारी, 22 एप्रिल, 5 मे, 20 जून, 28 जुलै, 12 ऑगस्ट, 22 ऑक्टोबर, 17 नोव्हेंबर आणि 13 डिसेंबरच्या रात्री आकाशात उल्कावर्षाव पाहण्याची संधी खगोलप्रेमींना मिळणार आहे. मंगळवार 14 जून रोजी ज्येष्ठ पौर्णिमेच्या आणि बुधवार 13 जुलै रोजी आषाढ पौर्णिमेच्या रात्री चंद्र पृथ्वीच्या जास्त जवळ येणार असल्याने आपणास दोन वेळा सुपरमूनच्या दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. इंग्रजी महिन्यात दोन पौर्णिमा येत नसल्याने ब्ल्यू मून योग मात्र यावर्षी येणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

दोन अंगारकी, तीन गुरुपुष्यामृत योग

या वर्षात सोने खरेदी करणार्‍यांसाठी 30 जून, 28 जुलै आणि 25 ऑगस्ट असे तीन गुरुपुष्यामृत योग येणार आहेत. गणेशभक्‍तांसाठी 19 एप्रिल आणि 13 सप्टेंबर रोजी अशा दोन अंगारकी संकष्टी चतुर्थी आहेत. ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर असे तीन महिने वगळता उर्वरित 9 महिन्यांत विवाह मुहूर्त असल्याने विवाहेच्छूंसाठी हे वर्ष चांगले असेल, असे सोमण यांनी सांगितले.

Back to top button