‘पुढारी’चे पुढारपण समाजहिताचेच; मुख्यमंत्र्यांचे गौरवोद्गार

‘पुढारी’चे पुढारपण समाजहिताचेच; मुख्यमंत्र्यांचे गौरवोद्गार
Published on
Updated on

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : 'पुढारी'ने समाजासाठी केलेले पुढारपण हे नेहमीच दिशा देणारे ठरले आहे. स्वच्छतेच्या कामामध्येही 'पुढारी'ने पुढारपण करावे, असे आवाहन करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र आघाडीवर नेण्याचे काम महायुती सरकारने केले आहे. महाविकास आघाडी सरकारकडून राज्याची झालेली पिछेहाट आम्ही थांबविली, तर देशाला तीन नंबरची अर्थव्यवस्था बनविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात काम करत आहेत म्हणूनच हा देश आघाडीवर जात आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

दै. 'पुढारी'चा 85 वा वर्धापन दिन ठाणे गडकरी रंगायतन येथे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे, खा. श्रीकांत शिंदे, आ. संजय केळकर, पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, जिजाऊ सामाजिक संस्थेचे अध्यक्ष नीलेश सांबरे, 'पुढारी'चे मुंबईचे कार्यकारी संपादक विवेक गिरधारी, 'पुढारी न्यूज'चे कार्यकारी संपादक तुळशीदास भोईटे, ठाणे, रायगड, पालघर आवृत्तीचे निवासी संपादक शशिकांत सावंत, मार्केटिंग हेड अमित तळेकर हे व्यासपीठावर होते.

कोकणात काम करणार्‍या यूथ आयकॉनचा सन्मान यावेळी करण्यात आला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, दै. 'पुढारी'चे संस्थापक ग. गो. जाधव यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात या वृत्तपत्राची मुहूर्तमेढ रोवली. त्या काळामध्ये समाजाला दिशा देण्याची गरज होती त्या काळामध्ये हे काम 'पुढारी' करत आला आणि आजही समाजासाठी भूमिका घेऊन काम करणे ही गोष्ट 'पुढारी' करत आहे. 'पुढारी'चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव आणि समूह संपादक डॉ. योगेश जाधव यांनी 'पुढारी'चा विस्तार करताना जनविकासाचा वसा घेऊन काम पुढे नेले आहे. आज 86 वर्षे या वृत्तपत्राला झाली. त्यामागे मोठी तपश्चर्या आहे. म्हणून या वृत्तपत्राच्या कामाला मी धन्यवाद देतो. अन्यायाला वाचा फोडण्याचे काम 'पुढारी'ने सातत्याने केले आहे. म्हणून या वर्तमानपत्राला जनआधार मिळाला आहे. असे सांगताना मुख्यमंत्री पुढे म्हणाले, 'पुढारी'चे छोटेसे रोपटे वटवृक्ष झाला आहे. या 'पुढारी'ने काम करणार्‍या तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी सन्मान सोहळा आयोजित केला आहे. हे मोठे काम आहे.

आम्ही महाराष्ट्र नंबर वन करत आहोत आणि पुढारीने महाराष्ट्रासाठी समाज उन्नत्तीचे काम केले आहे. जे नोकरी मागण्यापेक्षा नोकर्‍या देणारे झाले आहेत, त्यांचा मला अभिमान आहे, असे सांगताना मुख्यमंत्री पुढे म्हणाले, आज जगभरात भारताचा जो डंका होतो आहे, तो नरेंद्र मोदींसारख्या नेतृत्वामुळे होत आहे. समाजामध्ये नवा विचार देणे आणि समाज सजग करणे हे काम वृत्तपत्र करतात तसे नेतृत्वही करत असते. म्हणून या कामाला आपण अधिक महत्व दिले पाहिजे.

काम कसं करावं याचे उत्तम उदाहरण नारायणराव राणे यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात करून दाखवले आम्ही त्या काळात ठाण्याची घरे वाचवण्यासाठी त्यांच्याकडे गेलो होते. चार चार पाच पाच मजली इमारती तोडण्याच्या नोटिसा दिल्या होत्या. टी. चंद्रशेखर त्यावेळी महापालिकेचे आयुक्त होते. त्यावेळी आम्ही जुन्या इमारती तोडू नका म्हणून सांगण्यासाठी आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली गेलो होतो. त्यावेळी राणेसाहेबांनी आम्हाला विचारले, जुन्या इमारती पडल्या, लोकांचे जीव गेले तर काय करायचे, त्यावेळी दिघे साहेबांनी शब्द दिला, ज्या इमारती उत्तम आहेत, त्या वाचाव्यात अशी भूमिका घेतली आणि राणेसाहेबांनी ती मान्य केली. त्या एका रात्रीमध्ये आम्ही तो आदेश घेवून आलो आणि त्यांची घरे वाचवली. नारायण राणे यांनी मुख्यमंत्री म्हणून यशस्वी काम केले. तसेच विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांनी उत्तम काम केले. सरकारने चांगले काम केले तर चांगले म्हणण्याची त्यांनी भूमिका घेतली. आजकाल हे दुर्मीळ आहे. असे सांगताना, नारायण राणे यांच्या कारकिर्दीचा मुख्यमंत्र्यांनी गौरव केला.

नव्या वर्षात आम्ही स्वच्छतेचा उपक्रम हाती घेतला आहे. यामध्ये पुढारीने पुढाकार घ्यावा. ठाण्यापासून ही मोहीम आम्ही सुरू केली आहे. हे काम अविरत सुरू राहणार आहे. आज पुढारीच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने पुढारीच्या कामाचाही गौरव करतो. ग. गो. जाधव, प्रतापसिंह जाधव या सर्वांना धन्यवाद देतो. असे सांगत पुढारीने ज्यांचा गौरव केला त्या गौरवमूर्तींचेही मी अभिनंदन करतो. असे सांगत त्यांनी या कार्यक्रमाला विशेष धन्यवाद दिले.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कला, क्रीडा, साहित्य, सामाजिक, प्रशासन अशा विविध क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणार्‍या युवांचा पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला. यात प्रामुख्याने प्रशासनातील कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ.इंदू राणी जाखड, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तर ठाणे पुढारी आवृत्तीचे मुख्य प्रतिनिधी दिलीप शिंदे, रायगड आवृत्ती ब्युरो चिफ जयंत धुळप यांचाही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार दिलीप शिंदे यांनी मानले.

आजी-माजी मुख्यमंत्र्यांची शाब्दिक फटकेबाजी

या कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शाब्दिक कोट्यांसह आपल्या भाषणात जोरदार फटकेबाजी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नारायण राणे यांचे कौतुक केले. तर, नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांमुळे कसा कोकण विकास होत आहे, याबद्दल आपली भूमिका मांडली. नारायणराव राणेंच्या विरोधी पक्षनेतेपदाच्या कारकिर्दीवरून आताच्या विरोधी पक्षनेत्यांना मुख्यमंत्र्यांनी टोले लगावले. तर नारायण राणे यांनी नाव न घेता, उद्धव ठाकरेंना टोले लगावले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news