ठाणे : पावसाने उडवली दाणादाण; नागरिकांच्या घरात शिरले पाणी

ठाणे : पावसाने उडवली दाणादाण; नागरिकांच्या घरात शिरले पाणी

भिवंडी : पुढारी वृत्तसेवा : भिवंडीत गुरुवारी सकाळपासून सुरुवात केलेल्या पावसाने अक्षरश: दाणादाण उडवली. दुपारच्या सुमारास पावसाचा जोर वाढल्यामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पावसाचे पाणी साचले होते.

गुरुवारी ढगाळ वातावरणामुळे सकाळपासूनच अंधारल्यानंतर भिवंडी शहरात पावसाने दमदार हजेरी लावली. त्यानंतर दुपारी पावसाचा जोर वाढला. त्यामुळे अनेक रस्त्यांवर, सखल भागात त्या सोबत बाजारपेठ, भाजी मार्केट, तीनबत्ती या रहदारीने गजबजलेल्या भागात दीड ते दोन फूट पाणी साचले होते.

तीनबत्ती भाजी मार्केट परिसरात मोठा नाला असून नालेसफाई न झाल्याने या भागात दुकानदारांसह ग्राहकांना पाण्यातून वाट काढावी लागली. सकाळीच घाऊक भाजी मार्केटमध्ये खरेदीसाठी किरकोळ विक्रेते येत असल्याने या भागात पाणी साचल्याने अनेकांचा खोळंबा झाला होता.

मुंबई-नाशिक महामार्गावर वाहनांच्या प्रचंड रांगा…

भिवंडी शहरात सकाळपासून पडत असलेल्या पावसामुळे ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचलेले असतानाच मुंबई -नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी झाली. भिवंडी ठाणे बायपास मार्गावरही वाहतूक कोंडीमुळे जनजीवन विस्कळीत झाले. भिवंडी ठाणे बायपास महामार्गावर आठ पदरी रस्त्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्यामुळे ठिकठिकाणी हे काम अर्धवट अवस्थेत आहे. यामुळे या महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना वाहन चालकांना करावा लागत होता. यावेळी मुंबईच्या दिशेने जाणार्‍या वाहनांच्या सुमारे पाच ते सहा किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या होत्या. या वाहतूक कोंडीचा फटका या मार्गावरील मालवाहतूक करणारे व प्रवासी यांना बसला.

उड्डाणपुलावर साचले पाणी…

भिवंडी शहरात सकाळपासून सुरू झालेल्या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचल्याच्या घटना घडलेल्या असतानाच शहरातील मुख्य मार्गावरील स्व. राजीव गांधी उड्डाणपुलावर पाणी साचण्याची घटना घडली आहे. या उड्डाण पुलावरील ड्रेनेज पाईपची पावसाळ्यापूर्वी सफाई करणे गरजेचे असताना शहरातील पहिल्याच पावसात उड्डाणपुलावर पाणी साचल्याने तलावाचे रूप आले होते. त्यामधून मार्गक्रमण करताना वाहन चालकांना कसरत करावी लागली.

मुरबाडमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात

मुरबाड : पुढारी वृत्तसेवा

मुरबाड तालुक्यात सकाळपासूनच पावसाने सर्वत्र धो धो बॅटिंग सुरू केल्याने सर्वच ठिकाणी शेत ओहोळामध्ये पाणीच पाणी झाले. या पावसामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. गुरुवारी पडलेल्या पावसामुळे रानमाळावर पेरलेल्या भाताला मोठ्या प्रमाणात जीवदान मिळण्याचे चित्र दिसून येत आहे. शेतकरी वर्गाने एक आठवड्यापूर्वी आपल्या शेतात तसेच रानमाळावर भात पेरणी केली होती. परंतु चार ते पाच दिवस पावसाने दडी मारल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाला होता; परंतु गुरुवारी सकाळपासूनच पावसाने जोरदार सुरुवात केल्याने शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दिव्यात नाल्याचे पाणी नागरिकांच्या घरात

ठाणे : पुढारी वृत्तसेवा :

गुरुवारी पहाटेपासूनच दमदार पावसाच्या हजेरीने दिव्यातील नाले भरल्याने हे नाल्याचे पाणी अक्षरशःनागरिकांच्या घरात शिरले. त्यामुळे हातातील सर्व कामे बाजूला ठेवून नागरिकांना घरातील पाणी काढावे लागले असून दिव्यात नालेसफाई झालीच नसल्याने नागरिकांनी प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त केला आहे. तर दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त अक्षय गुडदे यांना निलंबित करण्याची मागणी यावेळी उबाठा पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.

दिव्यात नालेसफाईची कामे पूर्ण क्षमतेने झालेली नाहीत. पावसाळ्यात नालेसफाई पूर्ण क्षमतेने न झाल्यामुळे नागरिकांच्या बैठ्या घरांमध्ये पाणी शिरून घरातील वस्तूंचे नुकसान झालेले आहे. दिव्यात अनेक ठिकाणी नाल्यातील पूर्ण गाळ काढला गेलेला नाही. वरच्या प्लास्टिकच्या पिशव्या काढण्यात आलेल्या आहेत. नाले पूर्ण क्षमतेने साफ न केले गेल्याने गणेश नगर, विकास म्हात्रे गेट, बेडेकर नगर, डी. जी. कॉम्प्लेक्स, या ठिकाणी अक्षरशः नागरिकांच्या घरात पाणी घुसले आहे. दरवर्षी हा प्रकार पावसाळ्यात दिव्यात पाहायला मिळतो.

मागील घडलेल्या घटनांवरून दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त धडा घेणार नसतील, तर कामचुकार अधिकार्‍यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी रोखठोक भूमिका ठाकरेंच्या शिवसेनेचे दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी घेतली आहे.

दिवा शहरात पालिका प्रशासनाचे प्रमुख म्हणून सहाय्यक आयुक्त नीट जबाबदारी पार पाडणार नसतील, तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई होणे गरजेचे आहे. यामुळे प्रशासनाला शिस्त लागेल आणि दिवा शहराकडे बघण्याचा अधिकार्‍यांचा दृष्टिकोन बदलेल असेही रोहिदास मुंडे यांनी म्हटले आहे.

कारवाई होणे गरजेचे

दिवा शहरात जो गलिच्छपणा व अस्वच्छता अनेक ठिकाणी पाहायला मिळतो, त्याबाबत सुद्धा सहायक आयुक्तांनी भूमिका घेणे अपेक्षित होते. मात्र, ठाण्याला एक न्याय आणि दिवा शहराला एक न्याय, अशा पद्धतीचे प्रशासन येथे काम करणार असेल, तर अशा प्रशासनाच्या प्रमुख अधिकार्‍यांवर कारवाई होणे गरजेचे आहे, असेही मुंडे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news