फ्लॉवर @ ₹100; हंगामात उच्चांकी भाव मिळत असल्याने शेतकर्‍यांमध्ये समाधान

फ्लॉवर @ ₹100; हंगामात उच्चांकी भाव मिळत असल्याने शेतकर्‍यांमध्ये समाधान

दिवे : पुढारी वृत्तसेवा : दिवे (ता. पुरंदर) परिसरात फळबागांबरोबरच तरकारी भाजीपाल्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. सध्या येथील फ्लॉवर उत्पादक शेतकरीवर्गात आनंदाचे वातावरण पहावयास मिळत आहे. यंदाच्या हंगामातील फ्लॉवरला उच्चांकी दर मिळू लागला आहे. प्रतिकिलोला 35 रुपयांना फ्लॉवरची विक्री होत आहे.

यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे पुरंदर तालुक्यातील फ्लॉवरच्या उत्पादनात काहीसी घट झाली आहे. मात्र अशाही परिस्थितीत काही शेतकर्‍यांनी पुरंदर उपसा जलसिंचन योजना, शेततळे तसेच कुपनलिकेच्या उपलब्ध पाण्यावर फ्लॉवरचे दर्जेदार उत्पादन घेतले आहे.
येथील नितीन टिळेकर, रेश्मा टिळेकर, पांडुरंग गायकवाड आणि मनोज झेंडे या शेतकर्‍यांनी मे महिन्यात नर्सरीमधून तयार फ्लॉवर रोपे आणून लागवड केली. सुरवातीला शेणखत, गरजेपुरती रासायनिक खते वापरली. त्यानंतर पाण्याचे वेळेवर नियोजन करून औषध फवारणी केली. त्यामुळे कडक उन्हाळ्यातही पीक जोमदार आले. सध्या फ्लॉवरची काढणी सुरू आहे. फ्लॉवरला प्रित किलोला 35 रुपयांचा बाजारभाव मिळत आहे. तर बाजारात फ्लॉवरला मागणीदेखील वाढली आहे. किरकोळ बाजारात तर फ्लॉवर 100 रुपये किलोच्या पुढे विकला जात आहे.

टिळेकर यांनी 30 गुंठे क्षेत्रावर सीताफळ बागेत आंतरपीक म्हणून 5 हजार फ्लॉवरच्या रोपांची लागवड केली होती. त्यांना आत्तापर्यंत 50 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. अजून 35 हजार रुपये उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news