काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांनी अप्रत्यक्षपणे मैत्री निभावली : नरेश म्हस्के

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांनी अप्रत्यक्षपणे मैत्री निभावली : नरेश म्हस्के

ठाणे, पुढारी वृत्तसेवा : ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी समाजमाध्यमांवर टाकलेल्या आभाराच्या पोस्टमुळे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. खासदार म्हस्के यांनी सर्व नगरसेवकांचे आभार मानत काहींना पक्षीय बंधनामुळे थेट मैदानात उतरून प्रत्यक्षपणे मदत आणि प्रचार करता आला नाही. पण माझी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आपण मैत्री निभावून अप्रत्यक्षपणे मला निवडून आणण्याकरिता मदत केलीत. त्यामुळेच मला प्रचंड मताधिक्य ‍मिळाल्याचा दावा केला आहे.

ठाणे लोकसभा मतदार संघात शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे यांचा पराभव केला. त्याबद्दल जनतेचे आभार मानल्यानंतर आज (दि. 12) पुन्हा म्हस्के यांनी समाज माध्यमावर पोस्ट करीत आभार व्यक्त केले. त्यात म्हस्के म्हणतात, ठाणे महापालिकेत नगरसेवक, सभागृह नेता, स्थायी समिती सभापती आणि ठाण्याचा महापौर म्हणून गेली वीस वर्षे काम करत होतो. आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे महापालिकेत नेतृत्व करण्याची संधी मिळाली आणि त्याचमुळे महापालिकेतील कारकीर्द माझी यशस्वी ठरली. महापालिकेतील सर्वच नगरसेवक माझ्या पाठीशी उभे राहिले, मी घेत असलेल्या निर्णयांना वेळोवेळी पाठिंबा दिला, त्यामुळे ठाण्याचा प्रथम नागरिक महापौर या नात्याने मी शहरात यशस्वीपणे काम करू शकलो. कोविडच्या काळातही आपण सगळ्यांनी मिळून ठाणेकरांना दिलासा देणारे काम केले. एका वॉर्डातून बाहेर पडून एक नगरसेवक ते महापौर पदावर काम करत असताना आपण जो माझ्यावर ‍विश्वास ठेवलात त्याच विश्वासाच्या बळावर मी थेट संसदेत खासदार या पदापर्यंत पोहोचलो आहे. या संपूर्ण प्रवासात तुम्हा सगळ्यांच्या शुभेच्छा सहकार्य मदत लाभली म्हणूनच हा प्रवास सोपा झाला.

विशेषत: लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीतील सर्व घटक पक्ष, आमची शिवसेना, भारतीय जनता पार्टी ,राष्ट्रवादी अजित दादा पवार गट आणि म .न.से .यांनी मदत केली त्यामुळे ही निवडणूक मला यशस्वीपणे प्रचंड मताधिक्याने जिंकता आली. अर्थात काहींना पक्षीय बंधनामुळे थेट मैदानात उतरून प्रत्यक्षपणे मदत आणि प्रचार करता आला नाही. पण माझी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आपण मैत्री निभावून अप्रत्यक्षपणे मला निवडून आणण्याकरिता मदत केलीत. त्यामुळेच मला प्रचंड मताधिक्य ‍मिळाले. मला ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मदत केली त्या सगळ्यांचे मनापासून आभार. अशी भावना नरेश म्हस्के यांनी व्यक्त केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news