डोंबिवलीतील दत्तनगरमध्ये चायनिज सेंटर खाक; स्फोटात तीन जण गंभीर

डोंबिवलीतील दत्तनगरमध्ये चायनिज सेंटर खाक; स्फोटात तीन जण गंभीर

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : डोंबिवली पूर्वेकडील दत्तनगर येथील वर्दळीच्यारस्त्यावर पत्र्याच्या शेडमध्ये सिध्दी चायनिज सेंटर नावाने दुकान चालविले जाते. आज (दि.) दुपारच्या सुमारास सिलिंडरचा अचानक स्फोट होऊन सेंटरमधील पाच ते सहा कामगार गंभीर जखमी झाले. स्फोटानंतर लागलेल्या आगीत दुकान खाक झाले. या आगीत तीन जण गंभीर जखमी झाले असून दोन कामगार अत्यवस्थ असून सद्या ते खासगी हॉस्पिटलमधील आयसीयूमध्ये मृत्यूशी झुंज देत आहेत.

या दुकानात व्यापारी आणि घरगुती असे एकूण सहा सिलिंडर वापरले जात होते. स्फोटात त्यातीलच एक सिलिंडर फुटला. आगीवर अग्निशमन जवानांनी तातडीने नियंत्रण आणले नसते तर उर्वरित पाच सिलिंडर फुटून परिसरात मोठी नासधूस झाली असती, असे जवानांनी सांगितले. चायनिज पदार्थ बनविण्याची तयारी सुरू असताना हा स्फोट झाला.

सिलिंडरचा स्फोट होताच दत्तनगर परिसर हादरला. या स्फोटात चायनिज सेंटरचे चारही बाजुचे पत्रे आणि छत उध्दवस्त झाले आहे. स्फोट झाल्यानंतर लागलेल्या आगीत दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले. दुकानात एकूण 5 सिलिंडर होते. स्फोटाच्या आवाजाने भयभीत झालेल्या रहिवाशांनी घराबाहेर पळ काढला. परिसरातील रहिवाशांनी पाणी ओतून आग नियंत्रणाचा आणण्याचा प्रयत्न केला. भर वस्तीत स्फोट झाल्याने ही आग वायू वेगाने लगतच्या क्रांतीनगर आणि इंदिरानगर झोपडपट्टी परिसरात पसरली असती तर मोठी दुर्घटना घडली असती.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. दोन बंबांनी भडकलेल्या आगीवर पाण्याचा मारा करून आग नियंत्रणात आणली. आगीच्या भक्षस्थानी पडलेल्या दोन्ही गंभीर जखमींना तातडीने जवळच्या खासगी हॉस्पिटलमध्ये, तर अन्य तिघांना केडीएमसीच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सिलिंडरचा स्फोट नेमका कशामुळे झाला? यात तेथील कामगारांची काही चूक होती का? या दिशेने पोलीस या दुर्घटनेचा तपास करणार आहेत.

सिलिंडरच्या स्फोटाने आग लागताच दत्तनगर परिसरातील वाहने जागीच थांबली. त्यामुळे या भागात काही काळ वाहतूक कोंडी झाली. मुख्य रस्त्यासह अंतर्गत गल्ल्या वाहनांनी कोंडल्या होत्या. रामनगर पोलिस आणि डोंबिवली शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून वाहतूक कोंडी सोडवली. रामनगर पोलिसांनी स्फोट दुर्घटनेची चौकशी सुरू केली आहे.

कल्याण-डोंबिवलीवर पदार्थ विक्रेत्याचे आक्रमण

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेला शहर आणि ग्रामीण पट्ट्यात दुपारी चार वाजल्यापासून पहाटे चार वाजेपर्यंत फुटपाथसह रस्त्यांवर सिलिंडर लावून चायनिज पदार्थांचे विक्रेते हातगाड्या आणि पत्र्यांच्या शेडमध्ये बिनबोभाट धंदा करत असतात. या धंद्यांना कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, तसेच अन्न व औषध प्रशासनाकडून कोणत्या प्रकारची परवानगी नसते. त्यातच या धंद्याच्या नावाखाली चोरून दारू विक्री देखिल केली जात असल्याच्या तक्रारी आहेत.

केडीएमसीचे काही फुकटचंबू आणि पोलिसांच्या आशीर्वादाने रात्री उशिरापर्यंत चायनिज सेंटर्स बिनबोभाट सुरू असल्याच्या रहिवाशांच्या तक्रारी वाढल्या आहेत. ठाणे जिल्हा शहर पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे आणि केडीएमसीच्या आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांनी अशा बेकायदेशीर चालणाऱ्या चायनीज सेंटरवाल्यांवर कठोर कारवाईचे आदेश द्यावेत, अशी मागणी आता रहिवाशांकडून जोर धरू लागली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news