नाशिकच्या शिवसेना उमेदवाराचे काम भुजबळांना करावे लागेल : भरत गोगावले | पुढारी

नाशिकच्या शिवसेना उमेदवाराचे काम भुजबळांना करावे लागेल : भरत गोगावले

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : महायुतीचा जो काही तिढा काही ठिकाणी होता, तो सुटत चालला आहे. रायगडमध्ये सुनील तटकरे, बारामतीत सुमित्रा पवार यांचा प्रचार आम्ही करीत असून नाशिकमधील शिवसेना उमेदवाराचे काम छगन भुजबळ यांना करावेच लागेल, असे स्पष्ट करीत ठाण्याचा जागेचा तिढा येत्या दोन दिवसात सुटेल, असा विश्वास शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी आज (दि.१९) ठाण्यात माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी शिवसेना नेत्यांची चर्चा पार पडली. त्यानंतर, प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रवक्ते गोगावले यांनी नाशिक- ठाण्याची जागा शिवसेनेला सुटेल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच सिंधुदुर्ग – रत्नागिरीची जागा आम्ही सोडायला तयार नव्हतो. पण वरून आदेश आल्यानंतर उदय सामंत, किरण सामंत यांच्यासह आम्ही राणे यांचा उमेदवारी अर्ज भरून त्यांच्या प्रचाराला लागलो असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महायुतीला नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करायचे असेल, देशात ४०० पार आणि राज्यात ४५ पार करायचे असेल तर महायुतीतील नाराजी दूर करीत सगळ्या गोष्टी एकमेकांना समजून घेऊन काम करायला पाहिजे, असेही ते म्हणाले.

नाशिक येथे आमचा सिटिंग खासदार म्हणून ती जागा शिवसेनेची होती. त्याचप्रमाणे ती आम्हाला मिळावी आणि तिथे आमचा उमेदवार असावा, असे वाटते. आता नाशिकची उमेदवारी नाशिक जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते की खासदार हेंमत गोडसे यांना मिळणार, याबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री असे तिघे निर्णय घेतील, असेही ते म्हणाले.

याशिवाय माघार घेणारे नाराज भुजबळ शिवसेना उमेदवाराचे काम करतील का ? या प्रश्नाला उत्तर देताना गोगावले यांनी भुजबळांना काम करावेच लागेल, यामागील कारणे स्पष्ट केली. रायगड येथे सुनील तटकरे यांची सीट आहे. आम्ही पण एक पाऊल पुढे टाकून त्यांचे काम करतोय ना ! आता बारामतीमध्ये सुनेत्राताई पवार याच्या प्रचारही आम्ही केला. असून शिवाजी आढळराव पाटील यांच्याही प्रचाराला आम्ही गेलो होतो. जिथे त्यांना आमची आवश्यकता आहे. तिथे आम्ही जात आहोत, त्यांनीही जिथे आम्हाला आवश्यकता आहे तिथे यावे, तरच, राज्यात ४५ जागांचा आकडा आम्ही पार करू शकतो, असेही गोगावले यांनी सांगितले.

हेही वाचा :

Back to top button