ठाणे; अनुपमा गुंडे : नानाविध कारणामुळे आधीच व्यवसायाला लागलेल्या ओहोटीतून तग धरलेल्या महाराष्ट्रातील तमाशा फडांवर ऐन जत्रा-यात्रांच्या हंगामात आचारसंहितेचे कारण देत बंदी घालण्यात आल्याने हंगामात महाराष्ट्रातील हजारो तमाशा कलावंत आणि फड मालकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे.
गावकऱ्यांनी तमाशासाठी दिलेल्या सुपारीला पोलीस प्रशासन नकार देत असल्याने फड मालक हवालदिल झाले आहेत. सध्या एकीकडे लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी आणि त्याचवेळी गावोगावी भरणाऱ्या लहान-मोठ्या यात्रा जत्रा, असा माहौल आहे. जत्रा म्हटले की तमाशा, गण-गौळण आणि वगनाट्य हेच समीकरण महाराष्ट्रात रूढ आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, अहमदनगर, जळगाव, छत्रपती संभाजी नगर, धुळे, नंदूरबार, सोलापूर या जिल्ह्यात प्रामुख्याने तमाशाचे फड आजही रंगतात. साधारणतः एप्रिल आणि मे महिन्यात तमाशा फडांना आणि कलावंतांना मोठा रोजगार मिळतो. यंदा मात्र लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून स्थानिक पोलीसच तमाशांच्या सुपाऱ्या रोखू लागले आहेत.
महाराष्ट्रात १५० च्या घरात तमाशा फड आहेत. मार्च, एप्रिल, मे महिन्यात होणाऱ्या यात्रा – जत्रामधून आम्हांला पारंपारिक धंदा मिळतो. वर्षात तसा आमच्या हातांना ७ महिनेच काम असते. एक तमाशा फड ४० कुटुंबांना रोजगार देतो. यात्रेसाठी गावकऱ्यांनी आधीच तमाशासाठी सुपाऱ्या दिल्या आहेत. पण तमाशाच्या तारखेच्या दोन दिवस आधी पोलीस परवानगी नाकारत आहेत, असे खान्देश लोक कलावंत विकास प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष व फडमालक शेषराव गोपाळ धुळे यांनी सांगितले.
निवडणूका असल्याने कोणी राजकीय नेतेही तमाशांना मदत करण्यास पुढे येत नाहीत. आमच्या कलेत राजकारण नसते. तरी पोलीस आम्हांला का परवानगी देत नाही? हा हंगाम आमच्या कमाईचा आहे, त्यात पुन्हा सगळ्या खर्चाचा विचार करता फड मालक फक्त तमाशाचे अस्तित्व अबाधित ठेवू शकतो, त्यावर अवंलबून असणार्यांचे पोट भरू शकतो, आता या धंद्यात कमाई उरलीच नाही, तरी आचारसंहितेचा आणि आमच्या कलेचा संबंध का जोडला जातो, तेच कळत नाही, अशी तक्रार धुळेकर लोकनाट्य मंडळ धुळेच्या फडमालक सुनंदा कोचुरे यांनी व्यक्त केली.