Jitendra Awhad on Ajit Pawar : श्रीकांत शिंदे यांना पाडण्यासाठी अजित पवारांची सुपारी : जितेंद्र आव्हाडांचा गौप्यस्फोट | पुढारी

Jitendra Awhad on Ajit Pawar : श्रीकांत शिंदे यांना पाडण्यासाठी अजित पवारांची सुपारी : जितेंद्र आव्हाडांचा गौप्यस्फोट

ठाणे : पुढारी वृत्तसेवा : खासदार श्रीकांत शिंदे यांना पाडण्याची सुपारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली असल्याचा गौप्यस्फोट माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. अजित पवार हे महायुतीची मते खाण्याचे काम करत असून ते श्रीकांत शिंदे यांना पाडण्याचे काम करत असल्याचे आव्हाड म्हणाले. या सर्व प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घालावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. Jitendra Awhad on Ajit Pawar

आव्हाड यांच्या मतदार संघातील कळवा येथील खारभूमी मैदानासंदर्भात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. आव्हाड यांच्या या वक्तव्यामुळे ठाण्याचे राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. खारभूमी मैदानाबाबत आक्रमक झालेल्या आव्हाड यांनी हे मैदान खुले करण्यासाठी या ठिकाणी आमरण उपोषणाला बसू, असा इशाराही दिला आहे. Jitendra Awhad on Ajit Pawar

यावेळी ते म्हणाले की, अजित पवार यांनीच खारभूमी मैदानाला टाळे ठोकण्याचे आदेश दिले आहेत. मागील दहा बारा वर्ष कचऱ्यात असलेले हे मैदान आम्ही खेळण्यासाठी बनवले. याठिकाणी खेळाडू खेळण्यासाठी आणि लहान मुले क्रिकेटच्या सरावासाठी या येत असतात. परंतु, उपमुख्यमंत्री पवार यांनी अधिकाऱ्यांना बोलवून मैदानाला टाळे लावा, असा दम दिला असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला.

एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने या मैदानामध्ये कार्यक्रम केला. इतर राजकीय कार्यक्रमही या ठिकाणी झाले आहेत, त्यात कोणीही हस्तक्षेप केला नाही. मग अजित पवारांनी हा आदेश का दिला ? असा प्रश्न करून मैदान बंद करुन तुम्ही मर्दमुखी आहात, हे दाखवू नका, हा प्रकार करुन तुम्ही कळव्याच्या जनतेच्या मनातून उतरले आहात, अशी टीकाही आव्हाड यांनी यावेळी केली.

Jitendra Awhad on Ajit Pawar : मला लाज वाटते, मी काही वर्ष तुमच्यासोबत काम केले

येथून कोणाला आमदार व्हायचे आहे, त्यांनी जरूर व्हावे, पण मैदानाबाबत राजकारण नको. तुम्ही नेते आहात, मुख्यमंत्री म्हणून पुढे जाऊ शकता, मला लाज वाटते मी काही वर्ष तुमच्यासोबत काम केले, अशा शब्दांत त्यांनी पवार यांच्यावर टीका केली. या मैदानाला टाळे लावायचे असेल तर बाजूला ७२ एकर जमीन आहे. त्याला टाळे लावा, ती जमीन खाल्ली जात आहे, तुम्ही नेहमी सांगता मी विकासाचे राजकारण करतो, मग या पोरांचा विकास नको आहे का, माझ्या रागापोटी आणि येथील चमच्यांसाठी हे केले जात आहे. या ठिकाणी अजिबात मस्ती करायला येऊ नका, हे मी अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो, असा इशारा आव्हाड यांनी यावेळी दिला.

हेही वाचा 

Back to top button