Lok Sabha Election 2024 : एकनाथ शिंदे शिवसेनेच्या 13 उमेदवारांची नावे दिल्लीला | पुढारी

Lok Sabha Election 2024 : एकनाथ शिंदे शिवसेनेच्या 13 उमेदवारांची नावे दिल्लीला

ठाणे : पुढारी वृत्तसेवा :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या  13 उमेदवारांची नावे दिल्लीला पाठवली आहेत. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेला भाजपकडून 13 जागा मिळणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
संबंधित बातम्या 

13 उमेदवारांपैंकी 10 उमेदवारांना भाजपने संमती दर्शवली असली तरी या यादीतील 3 उमेदवार बदलण्याची शक्यता आहे. देशात लोकसभा निवडणुकांची सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्रात भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना हे तिन्ही पक्ष एकत्र येत महायुती केली आहे. भाजपने लोकसभा उमेदवारांसाठी पहिल्या यादीत 20 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. दरम्यान, आता राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेनेतील शिंदे गटातील उमेदवारांच्या नावांची घोषणा दोन दिवसांत होणार असल्याची चर्चा सुरू आहे. याबाबत दिल्लीत बैठका सुरू आहेत. गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 13 उमेदवारांच्या नावांची यादी भाजपच्या हायकमांडकडे पाठवल्याचे बोलले जात आहे.

लोकसभा उमेदवारांची यादी शिंदे गटाने दिल्लीत पाठवली आहे. या यादीत 13 जणांची नावे आहेत. 20 जागांसाठी आधीच भाजपने नावे घोषित केली आहेत. आता 48 जागांपैकी 13 जागा या शिवसेना शिंदे गटाला मिळणार असल्याचे बोलले जात आहे. यातील शिवसेनेचे विद्यमान खासदार आहेत. त्यांचीच नावे या यादीत असल्याचे बोलले जात आहे. या आधी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक झाली होती, या बैठकीत काही जागांवर उमेदवार बदलण्याबाबत अमित शाह यांनी सूचना केल्या होत्या. यानंतर शिंदे गटाने खासदारांची बैठक घेतली होती. पण, अजूनही जागावाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाही. काही जागांवर अजूनही पेच कायम आहे.
महायुतीचे जागावाटप अंतीम टप्प्यात येत आहे. तर दुसर्‍या बाजूला महाविकास आघाडीने आपला फॉर्म्यूला निश्चित केला आहे. सांगलीची जागा शिवसेना ठाकरे गट लढवणार आहे. तर भिवंडीत राष्ट्रवादी काँग्रेस आपला उमेदवार देणार आहे. त्या ऐवजी काँग्रेसला अन्य भागात जागा वाढवून दिल्या जाणार आहेत. असे सांगण्यात येत आहे. महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांमध्येही जागा वाटपासाठी सर्व पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. कल्याण लोकसभेसाठी श्रीकांत शिंदेंच्या विरोधात वरुण सरदेसाई यांची उमेदवारीही निश्चित झाल्याचे सांगण्यात येते. भिवंडीच्या ऐवजी पालघरची जागा काँग्रेसला मिळू शकते, असे चित्र गुरुवारी पुढे आले होते. निवडणुकीचे घोडा मैदान पुढे येऊ लागले तशी उमेदवारीसाठी रस्सीखेचही सुरू झाली आहे. कोकणात ही रस्सीखेच अधिक पाहायला
मिळत आहे.
राज्यात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. भाजपने पहिल्या यादीत 20 जागांची घोषणा केली आहे. शिंदे गटाला 13 जागा दिल्या, तर आणखी 15 जागांमधील काही जागा राष्ट्रवादीला सोडण्यात येणार आहेत, तर राहिलेल्या जागांवर भाजप आपले उमेदवार देणार आहे.  भाजप राज्यात 30 ते 32 लोकसभेच्या जागा लढवू शकते, अशी चर्चा सुरू आहे.

Back to top button