ठाणे : 24 कोटींच्या जमिनीसाठी झाला गोळीबार; 15 दिवसांपूर्वी जागामालकाने महेश गायकवाडांकडे मागितली होती दाद | पुढारी

ठाणे : 24 कोटींच्या जमिनीसाठी झाला गोळीबार; 15 दिवसांपूर्वी जागामालकाने महेश गायकवाडांकडे मागितली होती दाद

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : उल्हासनगरमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेची संपूर्ण राज्यात चर्चा सुरू असताना ज्या जमिनीसाठी हा गोळीबार झाला, त्या जमिनीची किंमत साधारणतः 23 ते 24 कोटींच्या घरात असल्याचे बोलले जात आहे. 20 दिवसांपूर्वी ही जमीन जागामालकाच्या ताब्यात असताना ही जमीन आ. गणपत गायकवाड यांच्या फेअर डील या कंपनीच्या नावे झाली आहे. संबंधित जागामालकाने कल्याणचे शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्याकडे यासंदर्भात दाद मागितली होती. नेमक्या याच कारणाने मोठा वाद निर्माण झाला आणि या वादाचे गोळीबारात रूपांतर झाले.

भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी कल्याणचे शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर हिललाईन पोलिस ठाण्यातच गोळीबार केल्याची घटना घडली. यानंतर संपूर्ण राज्यात या प्रकरणाची चर्चा सुरू झाली. या प्रकरणावरून विरोधी पक्षाने हे प्रकरण चांगलेच तापवले. सत्ताधारी भाजपला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणाची चौकशी केली जाईल, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे.

या पार्श्वभूमीवर ज्या जमिनीसाठी हा वाद निर्माण झाला, त्या जमिनीबाबतही अनेक महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत. कल्याण पूर्व परिसरातील द्वारली परिसरात ही जमीन आहे. जवळपास 26 ते 27 वर्षांपूर्वी या जमिनीचा व्यवहार हा रांका आणि पारेख या दोन विकासकांमध्ये झाला होता. मात्र 20 दिवसांपूर्वी ही जमीन मूळ मालकाकडे होती, असे सांगण्यात येत आहे. असे असताना ही जमीन फेअर डील या कंपनीच्या नावावर झाली असल्याचे सांगण्यात येते.

या जागेवर कंपाऊंड घालण्याचे काम सुरू असताना जागामालकाने याला विरोध केला. तसेच कल्याणचे शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्याकडे दाद मागितली. त्यानंतर गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्यात वाद उफाळून आला. हा वाद मिटवण्यासाठीच गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड उल्हासनगरच्या हिल लाईन पोलिस ठाण्यात समर्थकांसह आले होते. यावेळी मूळ जागा मालकालाही पोलिस ठाण्यात बोलावले होते.

जागा मालक, गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड, असे तिघेही जण पोलिस ठाण्यात बसले असताना गणपत गायकवाड यांनी पोलिस ठाण्यातच गोळीबार केल्याने या गोळीबारात महेश गायकवाड आणि राहुल पाटील हे दोघेही जखमी झाले. ही जमीन तब्बल पावणेपाच एकरची असून या जमिनीची किंमत 23 ते 24 कोटींच्या घरात असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या गोळीबाराच्या घटनेला आधी आर्थिक आणि नंतर राजकीय रंग असल्याचेही बोलले जात आहेे.

Back to top button