धूम्रपानविरोधी कारवाईला ठाण्यात ब्रेक | पुढारी

धूम्रपानविरोधी कारवाईला ठाण्यात ब्रेक

ठाणे, पुढारी वृत्तसेवा : ठाणे पोलिसांत एकही धूम्रपानाचा गुन्हा वर्षभरात दाखल झालेला नाही. याबाबत काही वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता ते स्वत:च धूम्रपानाच्या गुन्ह्याबाबत अनभिज्ञ असल्याचे समोर आले. विशेष म्हणजे गेल्या वर्षभरात कोट्यवधींचा अवैध गुटखा ज्या ठाण्यात पकडला जातो त्या ठाण्यात एकही धूम्रपानाचा गुन्हा दाखल न व्हावा याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्यात गुटखा, सिगारेट, तंबाखूजन्य पदार्थ अशा विविध धूम्रपानाच्या वस्तूंची खरेदी-विक्री करण्यास अथवा ते बाळगण्यास पूर्णतः बंदी आहे. या वस्तूंवर बंदी घालण्याबरोबर रुग्णालये, शासकीय कार्यालय आणि सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे यावरदेखील राज्य शासनाच्या कायद्यान्वये बंदी घालण्यात आली आहे. ठाणे शहरातील गेल्या वर्षभरातील धूम्रपानाच्या कारवाई संदर्भात माहिती घेतली असता, एकही धूम्रपानाची दंडात्मक अथवा स्थायी स्वरूपाची कारवाई झालेली नाही. याबाबत ठाण्याच्या काही वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता, त्यांनी आपल्याला यासंदर्भात माहिती नसल्याचे सांगितले.

नो स्मोकिंग झोन कोणते?

सर्वसाधारणपणे लोक आपले कामासाठी एकत्र येतात आणि अशी जागा छतासह अच्छादित असलेली जसे की, सभागृह, रुग्णालय इमारत, रेल्वे प्रतीक्षा कक्ष, करमणूक केंद्रे, रेस्टॉरंट, सार्वजनिक कार्यालये, न्यायालयीन इमारत, शैक्षणिक संस्था, ग्रंथालय, सार्वजनिक वाहने आणि ज्या ठिकाणी सामान्य जनतेद्वारे भेट दिली जाते, यामध्ये कोणत्याही मोकळ्या जागेचा समावेश होत नाही, अशा ठिकाणांचा नो स्मोकिंग झोनमध्ये समावेश करण्यात आला आहे.

Back to top button