ठाणे : पनवेल महापालिकेतील लाचखोर अधिकारी 'एसीबी'च्या जाळ्यात | पुढारी

ठाणे : पनवेल महापालिकेतील लाचखोर अधिकारी 'एसीबी'च्या जाळ्यात

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती अंतर्गत कार्यरत असलेल्या वार्ड अधिकाऱ्यास नवी मुंबई ‘एसीबी’ पथकाने ५ हजार रुपयांची लाच घेताना सोमवारी (दि.२०) रंगेहाथ अटक केली. मालमत्ता कराच्या पावतीवर नाव नोंद करण्याच्या मोबदल्यात त्याने लाच घेतली होती. विश्राम अभिमन्यू म्हात्रे ( वय ३६, वार्ड अधिकारी, प्रभाग समिती अ उप विभाग नावडे, पनवेल महानगरपालिका) असे या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, तक्रारदाराने पनवेल महापालिकेच्या हद्दीत एक गाळा खरेदी केला आहे. त्यामुळे मालमत्ता हस्तांतरण व टॅक्स पावतीवरील नावात बदल करण्यासाठी तक्रारदाराने संबंधित प्रभाग समितीत अर्ज केला होता. दरम्यान, महापालिकेच्या प्रभाग समिती ‘अ’ उपविभाग नावडे येथे कार्यरत असलेले वार्ड अधिकारी विश्राम म्हात्रे याने तक्रारदार यांच्याकडून मालमत्ता पावतीवर नाव लावण्यासाठी ५ हजाराच्या लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदाराने नवी मुंबई एसीबी पथक कार्यालयात याप्रकरणी फिर्याद दाखल केली. त्यानंतर त्याच दिवशी एसीबी पथकाने या घटनेची पडताळणी केली. या पडताळणीत विश्राम म्हात्रे या आधिकाऱ्याने लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर सोमवारी ( दि.२०) एसीबीच्या पथकाने अधिकाऱ्याच्या कार्यालयात सापळा रचला. व तक्रारदारांकडून ५ हजाराची लाच घेताना त्याला रंगेहाथ पकडले. याप्रकरणी त्याच्याविरूध्द तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

   हेही वाचा :

Back to top button