ठाणे : मुंब्य्रात शिवसेनेच्या दोन्ही गटांचे कार्यकर्ते आमने-सामने

ठाणे : मुंब्य्रात शिवसेनेच्या दोन्ही गटांचे कार्यकर्ते आमने-सामने

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : मुंब्रा येथील शिवसेना शाखेकडे जाण्यासाठी निघालेले शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांचा ताफा ठाणे पोलिसांनी अडवला. यावेळी शिवसेनेच्या दोन्ही गटांचे कार्यकर्ते आणि मुंब्य्राचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आमने-सामने आले होते. दोन्हीकडून जोरदार घोषणाबाजी सुरू होती. त्यामुळे काही काळ मोठा तणाव निर्माण झाला होता.

या ठिकाणी आलेले उद्धव ठाकरे यांच्याशी ठाणे पोलिस सहआयुक्त तसेच तीन पोलिस उपायुक्त दर्जाच्या अधिकार्‍यांनी सुमारे पंचवीस मिनिटे चर्चा केली. आम्ही कुठल्याही परिस्थितीत शाखेजवळ जाऊन पाहणी करू, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी यावेळी घेतली. आम्हाला शाखेजवळ जाऊन पाहणी करू द्या. माझ्यासोबत फक्त पाचजण असतील, असे ठाकरे यांनी पोलिसांना सांगितले. मात्र, पोलिसांनी वाढता तणाव लक्षात घेता शाखेजवळ जाऊन पाहणी करू नये, अशी विनंती ठाकरे यांना केली. यादरम्यान उपस्थित असलेल्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवल्याने ठाकरे यांच्यासोबत उपस्थित असलेले महाविकास आघाडीचे नेते संतप्त झाले. तुम्ही आधी त्या गटाच्या लोकांना आवरा नाही तर जबाबदारी आमची नाही, अशी भूमिका या नेत्यांनी बोलून दाखवली. पोलिस फक्त आम्हाला रोखण्यासाठी आले आहेत का, असा सवालदेखील यावेळी ठाकरे यांनी चर्चा करण्यास आलेल्या पोलिस अधिकार्‍यांना विचारला.

पोलिस बाजूला ठेवा आणि मग समोर या : ठाकरे

पोलिसांनी उद्धव ठाकरे यांना शाखेजवळ जाण्यापासून रोखल्यानंतर त्यांनी शाखेजवळ उभारलेल्या स्टेजवरून उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित केले. हिंमत असेल तर पोलिसांना बाजूला ठेवा आणि मग समोर या, असे आव्हान ठाकरे यांनी यावेळी दिले. आज मुंब्य्रात काही बरेवाईट घडले असते, तर महाराष्ट्राची अब्रू गेली असती. यांनी मधमाश्यांच्या पोळ्यावर दगड मारला आहे, मधमाश्या आता यांना डंख मारल्याशिवाय राहणार नाही. निवडणुका येऊ द्या, तुमची जागा दाखवू. शाखेची जागा आमची आहे, त्यामुळे त्या जागेवर आणून ठेवलेला कंटेनरचा खोका आम्ही फेकून देऊ, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

पोलिसांचा मोठा बंदोबस्त ः वाढता तणाव लक्षात घेऊन मुंब्य्रात सुमारे दीड हजाराहून अधिक पोलिस आणि राखीव पोलिस दलाच्या पाच तुकड्या असा फौजफाटा तैनात केला होता. ठाकरेंचा ताफा मुंब्य्रात पोहोचल्यानंतर दोन्ही गट आमने-सामने आले होते व दोन्हीकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येत होती.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news