छ. शिवरायांनी केलेल्या स्वारीचा बदला सुरतकडून घेतला जातोय : जितेंद्र आव्हाड
ठाणे : पुढारी वृत्तसेवा – छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरतेवर स्वारी केली होती. त्याचा बदला आता घेतला जात आहे. या बदल्याचा एक भाग म्हणूनच अनेक सरकारी कार्यालये, उद्योगांनंतर आता मुंबईतील १७ हजार कोटींचा व्यवहार होणारा हिरेबाजार सुरतला नेण्यात आला आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केली. दरम्यान, मराठा आरक्षणाचा निर्णय फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीच घेऊ शकतात. लोकसभेत कायदा पारित झाला तर मराठा आरक्षण कोणी रोखू शकत नाही, त्यासाठी आम्हा २८८ आमदारांना मोदींकडे घेऊन चला, असे आवाहनही आव्हाड यांनी सरकारला केले आहे.
मुंबईतील हिरे बाजार सुरतला स्थलांतरित करण्यात आले आहे. देशाला पोषणाऱ्या मुंबईला कमजोर करण्यासाठी मुंबईत असलेला हा हिरे बाजार स्थलांतरित करण्यात आल्याने डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला. आव्हाड पुढे म्हणाले, जगभरातील प्रमुख हिरे बाजारात मुंबईतील हिरे बाजाराचा समावेश होत आहे. पण, आता हा हिरेबाजार आता सुरतला नेण्यात आला आहे. केवळ हिरेबाजारच नव्हे तर अनेक बड्या संस्था आणि मुंबईत येऊ घातलेले उद्योग गुजरातला पळविण्यात येत आहेत. या मागील मूळ कारण छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरतेवर केलेली स्वारी हेच मुख्य कारण आहे.
सुरतेवरील या स्वारीचा वचपा काढण्यासाठीच आज महाराष्ट्र, मुंबईतील उद्योग, व्यापार केंद्र सुरतला नेले जात आहेत. एकूणच सुरतच्या स्वारीमागे शिवरायांचा बदला घेऊन मुंबईचे आंतराष्ट्रीय पातळीवरील महत्व कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, आपण मराठी माणसे हे सर्व सहन करत आहोत, हे दुर्देवी आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
दरम्यान, कतारमध्ये आठ माजी नौसैनिकांना ईस्रयालसाठी हेरगिरी करण्याच्या आरोपावरून फाशी दिली जाणार आहे. मुळात या संदर्भात खटला सुरू आहे, याची माहितीच देशाला परराष्ट्र मंत्रालयाने दिली नव्हती.
इस्रायलची मोसाद गुप्तहेर संघटना ही जगातील सर्वोत्तम गुप्तहेर संघटना आहे. अशा स्थितीत भारतीय इस्रायलसाठी हेरगिरी करतील, हे अनाकलनीय आहे. पण, आपला आंतराष्ट्रीय पातळीवरील दबदबा आहे, अशी आवई उठविणाऱ्यांनी त्या आठ जणांचे जीव वाचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्या आठ जणांना फासावर चढवल्याने त्यांचे कुटुंबीय वाऱ्यावर पडणार आहे, याची जाणीव ठेऊन त्या आठ जणांचे जीव वाचवण्यासाठी आंतराष्ट्रीय पातळीवर सरकारने प्रयत्न करावेत, असे आवाहन डॉ. आव्हाड यांनी केले.

