मुख्यमंत्री म्हणून कार्यकाळ पूर्ण करणार : मुख्यमंत्री शिंदेंचा विश्वास | पुढारी

मुख्यमंत्री म्हणून कार्यकाळ पूर्ण करणार : मुख्यमंत्री शिंदेंचा विश्वास

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकारने लोककल्याणकारी योजनांचा सपाटा लावल्याने विरोधक सैरभैर झाले आहेत. त्यातून लोकांची दिशाभूल करण्यासाठी मुख्यमंत्री बदलणार असल्याचे ओरडत आहेत. मात्र सरकार अजून मजबूत झाले असून हे सरकार माझ्या नेतृत्वाखाली कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास व्यक्त करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय देखील आपल्या बाजूने लागणार असल्याचा दावा केला आहे.

शिवसेना शिंदे गटाच्या दुसऱ्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी सुरू आहे. हा मेळावा ‘न भूतो न भविष्यति’ बनविण्यासाठी मंगळवारी ठाण्यात राज्यातील सर्व आमदार, जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख आणि मंत्री, नेते यांची बैठक झाली. या बैठकीला संबोधित करीत या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक मेळावा करण्याचे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसैनिकांना केले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेनेची बाजू ही सत्याची, बहुमताची आणि बहुमताची आहे. लोकशाहीत बहुमताला महत्व आहे, त्यामुळे आपण सर्वोच्च न्यायालयात जिंकू, आपलाच विजय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शिवसेनेचा आझाद मैदानावर दसरा मेळावा होणार असून खऱ्या अर्थाने बाळासाहेब ठाकरे यांचे विचार स्वतंत्र झाल्याचे सांगून मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि समाजवादी पार्टीच्या युतीवर टीकास्त्र सोडले. उद्धव ठाकरेंना वैचारिक दिवाळखोरी झाली असून ते आता समाजवादी पार्टी प्रमाणे ओवेसी यांच्या एमआयएम सोबत युती केली तर आश्चर्य वाटू नये, अशी खरमरीत टीका केली. ज्या काँग्रेसला गाडा असे बाळासाहेब सांगत होते त्याच काँग्रेसला मोठे करा, राहुल गांधी यांना पंतप्रधान करा, असे विचार उद्धव ठाकरे हे शिवतीर्थावरून शिवसैनिकांना देतील, असा टोलाही त्यांनी लगावला. राज्यात ६० लाख महिला बचत गट असून लवकरच दोन कोटी बचत गट बनविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून प्रत्येक आमदाराला पाच हजार महिला बचत गट बनविण्याचे निर्देश दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

या बैठकीला मंत्री उदय सामंत, दादा भुसे, गुलाबराव पाटील, दीपक केसरकर, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, भावना गवळी, राहुल शेवाळे, आमदार प्रताप सरनाईक, भरत गोगावले आदी उपस्थित होते.

Back to top button