Thane BJP: मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचे शक्तिप्रदर्शन | पुढारी

Thane BJP: मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचे शक्तिप्रदर्शन

ठाणे: पुढारी वृत्तसेवा : भाजपच्या महाविजय २०२४ अभियानातर्गंत मंगळवारी (दि. १७) ठाण्यात भाजपने प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात मोठे शक्तिप्रदर्शन केले. गडकरी रंगायतन येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतर जिल्हा परिषद ते सेंजॉन शाळेपर्यंत पायी पदयात्रा काढण्यात आली. यावेळी ढोल, ताशांसह भाजपचे शेकडो कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. त्यानंतर सेंजॉन शाळेजवळ चौक सभेचे आयोजन करण्यात आले होते. (Thane BJP)

भाजपच्या महाविजय २०२४ अभियानातर्गत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांचे दौरे करीत असून त्यांनी मंगळवारी ठाणे लोकसभा मतदार संघाचा दौरा केला. राज्यातून ४५ खासदार हे ५१ टक्के मते घेऊन नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा निवडणून देतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तर विधानसभेत भाजपचे २२५ आमदार असतील, असा दावाही बावनकुळे यांनी केला. कोणी कुठे उभे राहायचे ? कोणी कोणती जागा घ्यायची याचा निर्णय पार्लमेंटरी बोर्ड ठरवेल. मात्र महायुतीचा कोणातही उमेदवार असेल, प्रत्येक जागेची जबाबदारी ही भाजपचीच असेल, असा विश्वास बावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केला. (Thane BJP)

Thane BJP  : भाजप- शिंदे गटाकडून दावे-प्रतिदावे

ठाणे आणि कल्याण लोकसभेच्या जागेवरून भाजप आणि शिंदे गटाकडून जाहीररित्या नसले तरी दावे प्रतिदावे केले जात आहेत. दरम्यान, बावनकुळे यांनी मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात मोठे शक्तिप्रदर्शन करून एकप्रकारे अप्रत्यक्षरीत्या ठाणे लोकसभा भाजपची असल्याचा सूचक इशारा दिला. तर दुसरीकडे शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी तर जाहीररीत्या ठाणे आणि कल्याण लोकसभा शिवसेनेच्या ताब्यात असल्याने या दोन्ही जागांवर आम्ही दावा करणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र, तीनही पक्षाचे नेते यावर निर्णय घेतली, अशी सावध प्रतिक्रियाही त्यांनी यावेळी दिली आहे.

उद्धव ठाकरे यांच्यामुळे आरक्षण मिळाले नाही.

मराठ्यांना आरक्षण मिळावे, ही आमचीही इच्छा आहे. मात्र, यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण मिळाले नाही आणि हे सर्व रेकॉर्डवर आहे, असा आरोप यावेळी बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला. तसेच विनायक राऊत यांना यासंदर्भात बोलायचा काही अधिकार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

पंतप्रधानपदी कोण हवे, थेट जनतेशी साधला संवाद…

बावनकुळे यांनी ठाण्याच्या बाजारपेठेत जाऊन थेट जनतेशी संवाद साधता. दुकानातील व्यापारी, भाजी विक्रेते यांच्याशी संवाद साधून तुम्हाला पंतप्रधानपदी कोण हवे असा प्रश्न बावनकुळे यांनी सर्वसामान्य दुकानदारांना विचारला. यावर पंतप्रधानपदी पुन्हा मोदीच बघायला आवडतील, अशी प्रतिक्रिया काही व्यापाऱ्यांनी बावनकुळे यांना दिली.

हेही वाचा 

Back to top button