ठाण्यात आणखी ६८ आपला दवाखान्याची निर्मिती होणार | पुढारी

ठाण्यात आणखी ६८ आपला दवाखान्याची निर्मिती होणार

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : ठाण्यात ‘आपला दवाखाना या योजनेला वाढता प्रतिसाद बघून शहरात आणखी ६७ ठिकाणी आपला दवाखानाची निर्मिती करण्याचा निर्णय ठाणे महापालिका प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. शहरात ४५ ठिकाणी तर खाडीच्या पलिकडे २२ ठिकाणी आपला दवाखान्याची निर्मिती केली जाणार आहे. सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य सेवा देण्याच्या दृष्टिकोनातून हे महत्वाचे पाऊल उचलण्यात आले असून याचा चांगला फायदा सर्वसामान्यांना होणार आहे.

ठाण्यातील झोपडपट्टी परिसरात नागरीकांना मोफत प्राथमिक उपचार मिळावेत या दृष्टीने बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ही संकल्पना पुढे आणण्यात आली आहे. दिल्लीतील मोहल्ला क्लिनीकच्या धर्तीवर ठाण्यातही सध्या ४५ ठिकाणी आपला दवाखाना महापालिकेच्या माध्यमातून सायंकाळी ५ ते रात्री १० दरम्यान सुरु आहेत. याठिकाणी रुग्णांना मोफत औषधोपचार, ईसीजी, रक्त तपासणी, औषधे आदी सेवा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

ही आहेत महत्त्वाची ठिकाणे.

वागळे इस्टेट, सावरकरनगर, ढोकाळी, मानपाडा, दिवा, खिडकाळी, दातीवली, सावेगाव, सैनिक नगर, अमिनाबाद, एमटीएमएल कंपाऊंड, संजय नगर, रामनगर, हाजुरी, गांधी नगर, येऊर, बामनोई पाडा, कळवा आदी ठिकाणे निश्चित झाली आहेत.

काय आहे आपला दवाखाना संकल्पना…

दिल्लीत आप पक्षाच्या वतीने मोहल्ला क्लिनीक ही संकल्पना राबविली आहे. त्याच धर्तीवर ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरात आपला दवाखाना ही संकल्पना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु या योजनेला सुरुवातीला विरोधकांना जोरदार विरोध केला होता. असे असतांनाही शिवसेनेही ही योजना मंजुरी करुन घेतली होती. त्यानुसार पुढील पाच वर्षासाठी पालिकेच्या वतीने १६० कोटींचा खर्च केला जाणार आहे. शहराच्या विविध भागात आतापर्यंत ४५ आपला दवाखाना (ई हेल्थ स्मार्ट क्लिनिक) सुरू करण्यात आले आहेत. आता यामध्ये आणखी ६७ दवाखान्यांची भर पडणार आहे.

Back to top button