ठाणे; पुढारी वृत्तसेवा : ठाणे पोलिस आयुक्तालयात दाखल गुन्हेगारीचा आढावा घेतला, तर ठाण्यात सरासरी दररोज दोन विनयभंग आणि दरदिवसाला एक बलात्काराचा गुन्हा दाखल होत असल्याची बाब समोर आली आहे. ठाणे पोलीस आयुक्तालय हद्दीत 2022 या वर्षभरात 365 बलात्काराचे व विनयभंगाचे 627 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जानेवारी ते जुलै 2023 या सात महिन्यांच्या कालावधीत बलात्काराचे 211 तसेच विनयभंगाचे तब्बल 384 गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.
कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरात एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीवर भररस्त्यात चाकूने वार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली. यापूर्वीदेखील कल्याण डोंबिवली शहर सामूहिक अत्याचाराच्या घटनेने हादरली होती. लागोपाठ समोर येणार्या घटनांमुळे ठाणे जिल्ह्यात महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
राज्यात गेल्या तीन वर्षात महिलांवर होणार्या अन्याय- अत्याचाराच्या व छळवनुकीच्या घटनेत वर्षागणिक 12.24 टक्क्यांनी वाढ झाल्याची नोंद नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालात नमूद करण्यात आली आहे. मागील वर्षी म्हणजेच जानेवारी ते डिसेंबर 2022 या कालावधीत ठाणे पोलीस आयुक्तालयात 627 विनयभंगाचे तर 365 लैंगिक अत्याचाराचे गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. अत्याचाराच्या दाखल एकूण गुन्ह्यापैकी 309 गुन्ह्यातील आरोपींना गजाआड करण्यात यश आले आहे. विनयभंगाच्या गुन्ह्यांपैकी 496 गुन्ह्यातील आरोपींना अटक केली. दरम्यान, यावर्षी जानेवारी ते जुलै 2023 या कालावधीत बलात्काराचे 211 तसेच विनयभंगाचे तब्बल 384 गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.
ठाणे शहर आयुक्तालय हद्दीत दाखल गुन्ह्यांची आकडेवारी
बलात्कार
वर्षे गुन्हे
2020 220
2021 426
2022 365
2023 211 (जुलैपर्यंत)
विनयभंग वर्ष गुन्हे
2020 412
2021 501
2022 627
2023 384 (जुलैपर्यंत)