ठाणे : कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजपा-शिंदे गटात तणाव | पुढारी

ठाणे : कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजपा-शिंदे गटात तणाव

डोंबिवली, पुढारी वृत्तसेवा : कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजपा आणि शिवसेनेत तडा जाण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. शिंदे गट आणि भाजपातील तणाव कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. कल्याणमध्ये शिवसेनेच्या शिंदे गटापुढे भाजपाचे काहीही चालत नाही, असा आरोप भाजपाचे स्थानिक आमदार गणपत गायकवाड यांनी केला होता. आमदार गायकवाड यांच्या आरोपांना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याने चोख प्रत्युत्तर देऊन खळबळ उडवून दिली आहे.

रविवारी कल्याणमध्ये कल्याण जिल्हा भाजपकडून पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीची पत्रे वाटप आणि कार्यकारिणी निवडीचा कार्यक्रमात आमदार गणपत गायकवाड यांनी मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या समक्ष शिंदे गटावर टीका केली होती. त्यातच आगामी काळात कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर केडीएमसीवर भाजपाचाच महापौर बसेल, असे जाहीरपणे सांगून डोंबिवलीचे  रविंद्र चव्हाण यांनी युतीत खळबळ उडवून दिली. त्याचे पडसाद दुसऱ्याच दिवशी उमटले.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचा शिंदे गट आणि भाजपातील वाद शिगेला पोहोचला आहे. भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांची नार्को टेस्ट नाही तर सायको टेस्ट करा, अशी टीका शिवसेनेच्या शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी केली आहे. त्यांनी पुढे म्हटले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे की षंढ होण्यापेक्षा गुंड व्हा. आम्हाला गुंड म्हणणारे आमदार गायकवाड यांच्यावरही कितीतरी गुन्हे दाखल आहे. पोलीस संरक्षणाबद्दल बोललात तर आमदार गायकवाड यांच्या दोन्ही मुलांना पोलिसांचे संरक्षण आहे. त्यांची मुले काय करतात. पोलीस तर त्यांच्या घराबाहेर वॉचमन सारखे बसलेले असतात. केबल फुकट द्यायची आणि निवडून यायचे हे आमदारांचे काम आहे गेल्या पंधरा वर्षात हा मतदारसंघ दहा वर्षांनी मागे गेला आहे. धनुष्यबाण हा तर आमचा स्वाभिमान आहे. धनुष्यबाणावर टीका करू नका. तुमचे रॉकेट जनता कोणत्या जागेत घालेल हे सांगता येणार नाही.

कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात विकास नाही तर फक्त भ्रष्टाचार झाला आहे. कल्याण पूर्वेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक उभारणीचे भूमिपूजन तीन वेळा झाले. अखेर खा. डॉ. शिंदे यांच्या पुढाकाराने हे स्मारक उभारणीचे काम सुरू होत आहे. खोटेनाटे आरोप करत प्रसिद्धी मिळवण्याचा आमदार गायकवाड यांचा हा प्रयत्न आहे. आमदार गायकवाड युतीत काडी घालण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही युती धर्म पाळतोय आणि पालन करत राहणार, असेही शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी सांगितले.

हेही वाचलंत का?

Back to top button