

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : आगामी काळात कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर केडीएमसीवर भाजपाचाच महापौर बसेल, असा विश्वास व्यक्त करत सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी रविवारी कल्याणात बोलताना संकेत दिले. युतीच्या माध्यमातून ही निवडीची प्रक्रिया होईल. या सर्व प्रक्रियेत शिवसेनेला विश्वासात घेतले जाईल, असे ते म्हणाले.
रविवारी कल्याणमध्ये कल्याण जिल्हा भाजपातर्फे पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीची पत्रे वाटप आणि कार्यकारिणी निवडीचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी मंत्री चव्हाण माध्यमांशी बोलत होते
आगामी महापालिका आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाने कार्यकारिणीत नव्याने तरुण चेहऱ्यांना संधी दिली आहे. येणाऱ्या सर्वच निवडणुका शिवसेना-भाजपा युतीच्या माध्यमातून लढविल्या जातील. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत हेच सूत्र वापरले जाईल. या निवडणुकीनंतर पालिकेवर भाजपाचा महापौर असेल, असा विश्वास मंत्री चव्हाण यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या शब्दाला जागतील, असेही ते म्हणाले.
माकडे ज्या झाडावर असतात, ज्या झाडाला गोड फळे येतात. त्याच झाडावर दगडी मारल्या जातात. अशाच पध्दतीने आमदार गायकवाड यांनी भरपूर विकास कामे केली आहेत. ती काही जणांना सहन होत नाहीत. म्हणून ते आमदार गायकवाड यांना लक्ष्य करत आहेत. त्याकडे दुर्लक्ष करायचे असते, असा सल्ला मंत्री चव्हाण यांनी आमदार गायकवाड यांना दिला. आमदार गणपत गायकवाड यांनी या कार्यक्रमात शिवसेनेला लक्ष्य केले. त्यांच्याकडे धनुष्यबाण असले तरी माझ्याकडेही आता रॉकेट आहेत. तेही आता चांगले काम करून बाणाला उत्तर देऊ शकतात. मला छेडण्याचा प्रयत्न केला तर मी जशास तसे उत्तर देईन. कल्याण पूर्व भागात आतापर्यंत १२९ कोटींचा निधी मी आणला. काही मंडळींनी या निधी आणि कामाचे श्रेय मला मिळू नये म्हणून प्रत्येक टेबलखाली दडवून ठेवला असल्याचा गौप्यस्फोट करून आमदार गायकवाड यांनी केला.