लेखी आश्वासन मिळेपर्यंत ओबीसी आंदोलन सुरूच राहणार, ओबीसी महासंघाचा सरकारला इशारा | पुढारी

लेखी आश्वासन मिळेपर्यंत ओबीसी आंदोलन सुरूच राहणार, ओबीसी महासंघाचा सरकारला इशारा

नागपूर : पुढारी वृत्तसेवा मराठा समाजातील लोकांना सरसकट कुणबी अर्थात ओबीसी प्रमाणपत्र दिले जाणार नाही आणि सरसकट मराठा समाजाचे ओबीसीकरण केले जाणार नाही, ओबीसीतून आरक्षण नाही, असे लेखी आश्वासन राज्य सरकारकडून जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत नागपुरातील संविधान चौकात सुरू असलेले कुणबी, माळी, तेली आणि इतर अनेक संघटनाच्या सहकार्यातून सुरू असलेले राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे आंदोलन सुरूच राहणार आहे, असा इशारा ओेबीसी महासंघाने दिला आहे.

याबाबतची माहिती राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे संस्थापक, अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी माध्यमांशी बोलताना आंदोलनस्थळी दिली.
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाच्या सांगतेनंतर नागपुरातील आंदोलनाविषयीची उत्सुकता होती. गुरुवारी दिवसभर पाऊस सुरू असताना आंदोलनकर्त्यांचा उत्साह कायम होता. 17 विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपोषणाला बसले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांना उपोषण सोडविताना नेमके काय आश्वासन दिले याची माहिती कोणालाही नाही, याकडे बबनराव तायवाडे यांनी लक्ष वेधले. येत्या 18 सप्टेंबररोजी ओबीसी समाजाचे जिल्हानिहाय मोर्चे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहेत, असे त्यांनी सांगितले.

आंदोलनस्थळी बैलजोडीचे पूजन

दरम्यान, पोळ्यानिमित्त बैल जोडीचे पूजन करून आंदोलन व उपोषणास सुरुवात झाली. माजी मंत्री आमदार सुनील केदार, जिल्हा भाजप अध्यक्ष माजी आमदार सुधाकर कोहळे, कृती समितीचे अध्यक्ष पुरुषोत्तम शहाणे पाटील, अवंतिका लेकुरवाळे यांच्यासह कृती समितीचे सर्व सदस्य विविध समाज संघटनांचे प्रतिनिधी व उपोषणकर्ते उपस्थित होते.

Back to top button