डोंबिवली स्टेशनचा कायापालट ऑक्टोबरमध्ये होणार | पुढारी

डोंबिवली स्टेशनचा कायापालट ऑक्टोबरमध्ये होणार

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा :  शहराचा झालेला विस्तार, ग्रामीण भागाचे झपाट्याने सुरू असलेले नागरीकरण आणि त्यातच वाढणारी लोकसंख्या व प्रवाशांची संख्या याचा सारासार विचार करून रेल्वे प्रशासनाने डोंबिवली स्थानकाच्या कायापालटासाठी ऑक्टोबरचा मुहूर्त साधला आहे.

मध्य रेल्वे मार्गावरील सर्वाधिक गर्दीचे स्थानक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंबिवलीच्या स्थानकाचा कायापालट करण्याचा निर्णय रेल्वे मंडळाने घेतला आहे. या स्थानकात प्रवाशांना अत्यावश्यक असलेल्या सर्व सुविधा देण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाने केले आहे. गेल्या २० वर्षांत या स्थानकाचा दुसऱ्यांदा चेहरामोहरा जाणार असल्याने या स्थानकाशी निगडित असलेल्या साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

मुंबई रेल्वे विकास मंडळाच्या माध्यमातून टप्पा ३ / ए अंतर्गत हे काम हाती घेण्यात येणार आहे. रेल्वे मंडळाने मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील एकूण १७ रेल्वे स्थानकांचा विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये डोंबिवली, मुलुंड रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. या दोन्ही स्थानकांच्या विकासासाठी १२० कोटीचा निधी प्रस्तावित करण्यात आला असल्याचे अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. स्वयंचलित रेल्वे स्थानकाचा विचार करुन या स्थानकांचा कायापालट केला जाणार आहे. या कामांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत.

स्थानक १३० वर्षाचे

मध्य रेल्वेच्या या मार्गावर कर्जत, कसारा, बदलापूर लोकल भरून येतात आणि त्या लोकलमध्ये घुसून डोंबिवलीकर प्रवास नाईलाजाने करत असतात. यामुळे रेल्वे अपघाताचे प्रमाणही वाढले असून प्रवासी जखमी होत आहेत, तर काही दगावत आहेत. तथापी त्याचे कुणाला काहीही सोयरसुतक वाटत नाही. डोंबिवली स्थानक १३० वर्षाचे झाले असले आणि सर्वाधिक गर्दीचे असले तरी सर्वाधिक उपेक्षित आहे.

Back to top button