ठाणे : फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन पैशासाठी केले ब्लॅकमेल; महिलेने गमावला जीव | पुढारी

ठाणे : फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन पैशासाठी केले ब्लॅकमेल; महिलेने गमावला जीव

डोंबिवली, पुढारी वृत्तसेवा :  एकाच गावात राहत असल्याने झालेल्या मैत्रीमधून तरुणाने एका महिलेसोबत मोबाईलमधून फोटो काढले होते. या फोटोंचा आधार घेऊन हा तरुण सदर महिलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्याकडे सारखे पैसे मागत होता. ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणाकडून होणाऱ्या सततच्या छळाला कंटाळून व्यथित झालेल्या या महिलेने डोंबिवली जवळळील देसलेपाड्यातल्या राहत्या घराच्या इमारतीतील सहाव्या मजल्यावरून उडी मारुन जीवन संपवल्याची खळबळजनक घटना घडली.

गेल्या महिन्यातील ७ तारखेला सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास हा प्रकार घडला. मृत महिला कष्टकरी घरातील आहे. मजुरीसाठी ती आपल्या कुटुंबासह हरयाणा राज्यातील कैथल जिल्ह्यातील डोंगरपट्टी गावातून डोंबिवलीत राहण्यास आली होती. ही महिला आपल्या कुुटुंबासह डोंबिवली पूर्वेतील देसलेपाडा भागात असलेल्या नवनीतनगर येथील रवीकिरण सोसायटीत राहत होती. तर अजय ऋषीपाल (वय ३३) असे आरोपी तरुणाचे नाव आहे.

 मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अजय आणि मृत महिला हे हरियाणा राज्यातील एकाच गावामधील रहिवासी आहेत. त्यांच्यामध्ये मैत्री झाली होती. या मैत्रीतून अजय याने सदर महिलेसोबत मे महिन्यात मोबाईलमधून काही फोटो काढले होते. मैत्रीतून हे फोटो काढल्याने अजय त्यांचा दुरुपयोग करील, असे या महिलेला वाटले नव्हते. गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत अजय याने त्या फोटोंचा आधार घेऊन सदर महिलेला त्रास देण्यास सुरुवात केली.

तू मला पैसे दे, नाहीतर तुझ्यासोबत काढलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल करतो, असे अजय या महिलेला धमकावू लागला. एकीकडे सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल झाल्यास कुटुंबीयांसह समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागेल, अशी भीती या महिलेला वाटू लागली होती. तर दुसरीकडे अजयने पैशांसाठी तगादा सुरूच ठेवला होता. महिलेकडून पैसे मिळत नसल्याची खात्री पटल्यानंतर ब्लॅकमेलर अजय फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले.

हा प्रकार सहन न झाल्याने या महिलेने ७ जुलै रोजी सायंकाळी ४.४५ वाजण्याच्या सुमारास आपल्या डोंबिवलीतील राहत्या घराच्या सहाव्या मजल्यावरून उडी घेतली. यातच ती गतप्राण झाली. या महिलेचा गावाकडील नातेवाईक भीम सिंह (६३) यांच्या तक्रारीवरून ब्लॅकमेलर अजय ऋषीपाल याच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी डोंबिवलीसह हरयाणा राज्यातील मूळ गावी जाऊन चौकशी केल्यानंतर गुन्हा दाखल केला. या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील अधिक तपास करत आहेत.

हेही वाचलंत का?

Back to top button