मृतांच्या टाळूवरच लोणी खाऊ नका; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ‘मविआ’ला प्रत्युत्तर | पुढारी

मृतांच्या टाळूवरच लोणी खाऊ नका; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे 'मविआ'ला प्रत्युत्तर

ठाणे, पुढारी वृत्तसेवा : ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात १८ रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर विरोधकांच्या रडावर आलेल्या या रुग्णालयाच्या बाजूने स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उभे राहिले आहेत. ही दुर्दैवी घटना असून सखोल चौकशी नंतर दोषी अढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल. मात्र या रुग्णालयाबाबत चुकीचे गैरसमज पसरवले जात आहेत. मी स्वतः रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांशी बोललो असून त्यांनी उपचारांबाबत समाधान व्यक्त केले आहे. त्यामुळे यावर राजकारण करणे म्हणजे मृताच्या टाळूवरच लोणी खाण्यासारखं आहे, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर केली आहे. एकनाथ शिंदे यांनी सोमवारी रात्री उशीरा रुग्णालयाला भेट दिली. यावेळी शिंदे यांनी रुग्णालयातील परिस्थितीचा आढावा घेतला.

एकनाथ शिंदे म्हणाले,  रुग्णालयासाठी ६० कोटींचा निधी मांजर केला आहे. येत्या १० दिवसांत म्हणजेच २५ ऑगस्टपर्यंत यासंदर्भातील अहवाल सादर करण्याचे आदेशही दिले आहेत. कळवा रुग्णालयात एकाच दिवशी १८ जणाचा मृत्यू झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री  रुग्णालयात झालेल्या १८ मृत्यू नक्की कशामुळे झाले? आणि कोणत्या परिस्थितीत झाले? याची माहिती त्यांनी यावेळी जाणून घेतली. तसेच कार्यपद्धतीमध्ये बदल करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयांतील वॉर्ड तसेच आयसीयूमध्ये जाऊन रुग्णांची देखील भेट घेऊन आरोग्य व्यवस्थेबाबत रुग्णांची विचारपूस केली.

हेही वाचलंत का?

Back to top button